(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये, देवेंद्र फडणवीसांची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील आहे. या कठीण समयी लोकांना तुम्ही काय मदत करता हे अपेक्षित आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे थिल्लरबाजी करणे त्यांना शोभत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, मग पंतप्रधानही बाहेर पडतील. नाहीतरी ते बिहारला जातच आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील आहे. या कठीण समयी लोकांना तुम्ही काय मदत करता हे अपेक्षित आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे थिल्लरबाजी करणे त्यांना शोभत नाही. मोदीजी थेट लडाखला जातात, त्यामुळे उगाच स्वत:ची तुलना करु नये. आज मुख्यमंत्री थोडावेळ बाहेर पडले. काही तासांचा त्यांनी प्रवास केलाय, मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इतर गोष्टी सोडून राज्य सरकार आता काय मदत करते याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. केंद्र सरकार मदत करेलच यात शंका नाही. मात्र अशा गंभीर दौऱ्यात अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने कुठलेही पैसे अडकवले नाहीत. राज्य सरकार केवळ टोलवाटोलवी करतेय. काहीही झालं की केंद्र सरकारवर बोट दाखवायचं. राज्य चालवायला हिम्मत लागते. केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत. अजित पवार हे जनतेची दिशाभूल करत असून मला अर्थशास्त्र चांगले कळतं. लोकांची उगाच दिशाभूल करु नका. नुकसान भरपाईचे बोला. राज्य सरकारची 1 लाख 20 हजार कोटींच कर्ज काढण्याच क्षमता आहे. 50 हजार कोटींच कर्ज काढलं असून अजून 70 हजार कोटींचं कर्ज काढण्याची राज्य सरकारची क्षमता आहे. आम्ही शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता 10 हजार कोटींची मदत केली होती, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
केंद्राची वाट न पाहता राज्याने तातडीने मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "विरोधी पक्षनेत्यांनी दिल्लीत जावं, मग पंतप्रधानही बाहेर पडतील. नाहीतरी ते बिहारला जातच आहेत. केंद्र सरकार हे परदेशातलं सरकार नाही." तसंच या विषयात राजकारण करुन नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. "सध्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं संकट आहे तर सोबत काम करुन केंद्राची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे," अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
संबंधित बातम्या