दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली, निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश
High Court : पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.
Shiv Sena High Court : पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
धनुष्यबाणासाठी उद्धव ठाकरे गटानं दिल्लीतील हायकोर्टात धाव घेतली होती. पण आज कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. हा त्यांना मोठा धक्का मानला जातोय. अंधेरी पोट निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव गोठवलं होतं. त्यानंतर शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तात्पुरतं दिलं होतं. पण ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णायाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे, त्याशिवाय पक्षचिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गट यापुढे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.
याचिकामध्ये काय म्हटलं होतं?
8 ऑक्टोबर रोजी हायकोर्टानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. निवडणूक आयोगानं हा निर्णय घाईमध्ये घेतल्याचं सांगत ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली होती. नियमांचं पालन झालेलं नाही, असाही आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ज्या कारणासाठी धनुष्यबाण गोठवलं होतं, ते कारण आता राहिलेलं नाही. त्यामुळे आता स्थिती पूर्वरत करावी, असे याचिकामध्ये म्हटलं होतं. आयोगानं पक्षचिन्ह गोठवलाता आमची बाजू ऐकली नाही.
हायकोर्टानं काय म्हटलं?
निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करत दिल्ली हायकोर्टानं शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्याशिवाय चिन्हाचा अंतिम निर्णय तातडीने घ्यावा, असे आदेश निवडणूक आयोगाला हायकोर्टानं दिले आहेत. पक्षचिन्हाच्या निर्णायाचे अधिकार हे निवडणूक आयोगालाच आहेत, त्यामध्ये कोर्ट पडत नाही. त्यामुळेच पक्षचिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण गोठवलेलंच असेल.
ठाकरेंना मशाल तर शिंदेंना ढाल-तलवार
एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांना हाताशी धरत शिवसेनेतून बंड केला. त्यानंतर पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला. या दोन्ही बाबी सध्या कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे आहेत. पण 8 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं. तर शिंदेंना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आणि नाव बाळासाहेबांची शिवसेना असं देण्यात आलं. सध्या चिन्हावरुन निवडणूक आयोगापुढे लढाई सुरु आहे.