सुरेश धसांचा पंकजा मुंडेंना टोला, धनुभाऊंसाठी प्रार्थना; सरपंच हत्याप्रकरणावरुन आमदाराने सगळंच काढलं
पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश धस म्हणाले की, दाऊदपूर परिसरात हजारो टिप्परने उपसा केला जातो, दीडशे दीडशे गुंड घेऊन कोण लोकं येतात
बीड : जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीडमधील गुंडागर्दी, भ्रष्टाचार आणि दादागिरीवरुन आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी पाठक हे जवळपास एक महिना प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ते आजच रुजू झाले आहेत. त्यामुळे, जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पाठक यांची भेट घेऊन संतोष देशमुख यांच्या खूनासंदर्भात चर्चा केली. बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्यासंदर्भात धस यांनी चर्चा करुन हे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, बीडमधील अवैध उत्खनन आणि खूनप्रकरणातील आका म्हणत बीडच्या (Beed) दोन्ही मंत्र्यांना लक्ष्य केलं. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना (Pankaja munde) टोला लगावला, तर धनंजय मुडेंसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश धस म्हणाले की, दाऊदपूर परिसरात हजारो टिप्परने उपसा केला जातो, दीडशे दीडशे गुंड घेऊन कोण लोकं येतात. परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा देखील दाखल करुन घेत नव्हते. परळीजवळील वडगाव नावाचं एक गाव आहे, इथं हरळीसुद्धा उगवत नाही. परळी शहरात श्वसनाचे आजार किती लोकांना झाले आहेत, लहान लहान पोरांना सुद्धा दमा लागायलाय. कारण, हे उघडे-नागडी राख घेऊन जातात, कितीतरी धुरळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडं आलंय. पर्यावरण खात्याने थोडीसी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी फिरवावी, असे म्हणत सुरेश धस यांनी थेट मंत्री पंकजा मुंडेंना लक्ष्य केलं. कारण, पंकजा मुंडे यांच्याकडेच राज्याच्या पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, 600 पैकी 300 वीटभट्ट्या एकट्या शिरसाळ्यात बोगस आहेत, त्याही सरकारी जागेवर. मग त्याला पाबंद लावला पाहिजे, अशा प्रकारचे पत्रही मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली.
धनंजय मुंडेंसाठी पार्थना
बीड हत्याप्रकरणात बडा नेता कोण हे मला माहिती नाही. पण, यातले आका 101 टक्के, मी सुरुवातीपासून सांगतोय. व्हिडिओ कॉलवर दाखवून संतोष देशमुख यांना क्रूरतेने मारलं आहे. मग, तो 302 चा आरोपी झालाच. पण, सध्या आकावर खंडणीचाच गुन्हा दाखल आहे, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरता. फक्त देवाच्या कृपने किंवा मी प्रार्थना करतो फक्त आकाचे आका त्यात सापडू नयेत, असे म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंबद्दल भूमिका व्यक्त केली. मला वाटतं ते नाही सापडणार, कारण आकांना फोन घेऊन कुणाला-कोणत्या भाषेत बोलायचं ही त्यांची स्टाईल मला चांगलीच माहिती आहे, असेही धस यांनी म्हटलं.