Suresh Dhas: पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरुन वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये वाद: सुरेश धस
Walmik karad: वाल्मीक कराड आज संध्याकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. सुरेश धस यांनी त्यांच्याबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी पुन्हा एकदा नव्या आरोपांची राळ उडवून दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार असल्याचा ठपका असणारे वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये सध्या द्वंद्व सुरु आहे. पोलिसांसमोर हजर व्हायचे की नाही यावरुन दोघांमध्ये वाद सुरु असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. सुरेश धस यांनी सोमवारी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
वाल्मीक कराड यांना सीआयडीच्या पथकाने रविवारी रात्रीच अटक केली आहे, अशी चर्चा आज सकाळपासून होती. याबाबत विचारले असता वाल्मीक कराड यांनी म्हटले की, 'आका' आतमध्ये गेले आहेत की नाही, हे मी आता सांगणार नाही. मला सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळाल्याशिवाय मी याबाबत काहीच बोलणार नाही. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासावर मी समाधानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व यंत्रणा 150-200च्या स्पीडने कामाला लावल्या आहेत. ते म्हणतात ना, ' बकरे की माँ कब तक दुवा माँगेगी'. या प्रकरणातही दुवा फारकाळ चालणार नाही, दुवा अर्ध्यातच सुटणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले.
सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना टोला
या पत्रकार परिषदेत सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील राख आणि वाळुचा उपसा आणि वीटभट्ट्यांच्या मुद्यावरुन अप्रत्यक्षपणे राज्याच्या नवनिर्वाचित पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनाही लक्ष्य केले. राज्याचे पर्यावरण खाते आमच्या जिल्ह्याकडे आहे. बीडमधील शिरसाळ्यातील सरकारी जमिनीवर 600 वीटभट्ट्या आहेत, त्यापैकी 300 वीटभट्ट्या बोगस आहेत. पर्यावरण मंत्र्यांनी त्याकडे वक्रदृष्टी सोडा, सरळ दृष्टी वळवली तरी या सगळ्याला आळा बसेल. मी जिल्हाधिकाऱ्यांना या अनधिकृत वीटभट्ट्या बंद करण्यासाठी पत्र दिले आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.
सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांमध्ये वाल्मीक कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची रविवारी सीआयडीच्या पथकाने 9 तास चौकशी केली होती. याबद्दलही सुरेश धस यांना विचारण्यात आले. त्याबाबत बोलताना सुरेश धस यांनी म्हटले की, सीआयडीने कोणाला तपासाला बोलवावे, हा त्यांचा अधिकार आहे. आयजी लेव्हलचे अधिकारी असल्यामुळे तपासात कोणतेही अडथळे येणार नाहीत, असा विश्वासही सुरेश धस यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बड्या नेत्याला 16 कॉल?; सुरेश धस म्हणाले, आकाचे आका...