विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार, भिवंडीतील दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचा निर्धार
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकासाचे हंडी उंच चालली आहे. विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Devendra Fadnavis : भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाचे हंडी उंच चालली आहे. विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला असल्याचे फडणवीस म्हणाले. माजी खासदार कपिल पाटील फाउंडेशन दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत बोलत होते.
मागच्या काळात देखील भिवंडीचा चित्र बदलण्याचं काम आम्ही केलं होतं. मध्ये थोडा अडीच वर्षाचा खंड पडला. परंतू, आता चिंता करु नका पुन्हा एकदा भिवंडीचे चित्र बदलण्याचा काम आपलं सरकार करणार आहे. भिवंडी शहराला आधुनिक शहर करण्याचं काम आम्ही करु असे फडणवीस म्हणाले. तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा आम्ही तुमच्यासोबत विकासाचे मनोरे रचू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सर्व गोविंदा पथकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मनोरे रचताना सुरक्षेचे काळजी देखील घ्या कारण तुम्ही देशाचं भविष्य आहात आपला भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे असे फडणवीस म्हणाले. मी जेव्हा जेव्हा भिवंडीत येतो तेव्हा वरुनराजाला घेऊन येतो असेही फडणवीस म्हणाले.
राजधानी मुंबईत मोठ्या उत्साहात दहीहंडी
राजधानी मुंबईत दहीहंडी (Dahihadi) उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक राजकीय नेते दहीहंडी उत्सवात सहभागी होत गोविंदाचा उत्साह वाढवत आहेत. दुसरीकडे अभिनेते, सेलिब्रिटीही आणि नृत्यांगणा गौतमी पाटीलचाही जलवा पाहायला मिळत आहे. उंचच उंच मनोरे रचत गोविंदा पथके नव्याने विक्रमही रचत आहेत. एकीकडे गोविंदा पथकांनी विक्रमांचे मनोरे रचले असताना दुसरीकडे मुंबईतील (Mumbai) मानखुर्द एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे, दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून दहीहंडीचा रोप बांधताना हा अपघात (Accident) झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील दहीहंडी उत्सावात सकाळपासून 30 गोविंदा जखमी
मुंबईतील दहीहंडी उत्सावात सकाळपासून 30 गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्द येथे दुपारी 3 वाजता गोविंदाच्या अपघाताची घटना घडली. जगमोहन शिवकुमार चौधरी असं मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदाचे नाव आहे. जखमी झालेल्या 30 गोविंदांपैकी प्राथमिक उपचारानंतर 15 गोविंदाना आलं घरी सोडण्यात आलं आहे. तर, अद्यापही 15 गोविंदा उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहेत.
























