हजारो किलोमीटरचे अंतर पार करत अमूर ससाणा पालघर मध्ये दाखल; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
भारतात अमूर, मर्लिन, शाईन आणि पेरिग्रीन असे चार प्रकारचे फाल्कन पाहायला मिळतात. कीटक, बेडूक किंवा काही वेळा छोटे पक्षी हे अमूर फाल्कनचे खाद्य आहे.
पालघर : वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणारा पक्षी’ (दोन हजार किमी हून अधिक स्थलांतर) अशी विशेष ओळख असलेला अमूर फाल्कन हा हजारो किलोमीटरचे अंतर पार करत पालघर जिल्ह्यात विश्रांतीसाठी विसावला आहे. पालघर मधील पक्षी मित्र, वन्यजीव छायाचित्रकार, पर्यावरण विज्ञान (Environmental science) चे विद्यार्थी वैभव हलदीपूर यांनी या सुंदर पक्ष्याची छबी कॅमेरामध्ये कैद केली आहे. अमूर फाल्कन समूहात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पालघरमध्ये नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले आहेत. काही दिवसातच हा पक्षी पुढील पुढील प्रवासासाठी शारीरिकरित्या सुदृढ होऊन काहीशा विश्रांती नंतर हा पक्षी अरबी समुद्र पार करून दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झेप घेत पुढील प्रवासाला सुरुवात करेल.
अमूर फाल्कन वर्षातून दोनदा ये-जा करतो. 2017 नंतर तब्बल 4 वर्षांनी फाल्कन पालघरमध्ये स्थिरावला. विशेष म्हणजे या पक्ष्याचा अर्धा मेंदू कायम सतर्क असतो. त्यामुळे फाल्कन सलग 48 तासहून अधिक वेळ हा आकाशात उडू शकतो. भारतात अमूर, मर्लिन, शाईन आणि पेरिग्रीन असे चार प्रकारचे फाल्कन पाहायला मिळतात. कीटक, बेडूक किंवा काही वेळा छोटे पक्षी हे अमूर फाल्कनचे खाद्य आहे. रशिया मंगोलिया येथून अमूर फाल्कन भारतात नागालँड येथे दाखल होत तेथून प्रवास करत हे पक्षी पालघर आले असतील, असा अंदाज व्यक्त वर्तविला जात आहे.
या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी आणि पाणथळ भागात तीनशेहून अधिक देशी-विदेशी पक्ष्यांचा वावर असतो. पालघर जिल्ह्यातील वसई , विरार , दातीवरे, नांदगाव, दांडी, उनभात, चिंचणी, वरोर, वाढवण , बोर्डी झाई ह्या किनारपट्टी भागात, नॉन डिस्टर्बिंग भाग असल्या कारणामुळे हे पक्षी येथे ऑगस्ट पासून दिसायला सुरुवात होतात. यापैकी दातीवरे आणि वाढवण किनाऱ्यावर यातले पक्षी हमखास दिसत असतात सुमारे 40 हून अधिक पक्षांचा या किनाऱ्यांवर वावर आढळून येत आहे. यातील काही पक्षी हे विणीच्या हंगामात त्यांच्या घरट्यांसह दिसून आले आहेत. तांबड्या छातीची हरोळी, कलहंस, नीलिमा, नवरंग, काळ्या डोक्याचा खंड्या, हळदी कुंकू बदक, नकेर, चातक, लाल कंठाची तिरचिमणी, चिंबोरी खाऊ, रेड नेक फॅलेरोप, पलास गल, उलटचोच तुतारी, सफेद मोठा कलहंस, रंगीत तुतारी, ग्रे-प्लॉव्हर, रिंग प्लॉव्हर , कास्पियन प्लॉव्हर , या सारखे इतर समुद्रपक्षी आणि पाणथळ भागात दिसणारे पक्षी पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत आणि पाणथळ भागांत दिसतं असतात.
समुद्रमार्गे किनारपट्टी भागात हजेरी
समुद्रामार्गे ओमानहून उडाण घेऊन थंडीच्या महिन्यात वाढवण किनारी चिंबोरी खाऊ तसेच उत्तर अमेरिकेहून रेडनेक फॅलेरोप , मंगोलियाहून उडाण घेऊन कलहंस हा पक्षी वाढवण मधील पाणथळ भागात दिसून आला आहे. उत्तर अमेरीकेहून रेड नेक फॅलेरोप हा पक्षी चिंचणी भागातील पाणथळ भागांत दिसून आला आहे. तर ह्या पक्षांन प्रमाणे इतर 40 हून अधिक स्थलांतरित पक्षी आपल्या पालघर जिल्ह्यात दिसून आले आहे. तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात देशी आणि विदेशी पक्षी असे मिळून एकंदर तीनशेहून अधिक पक्षांच्या नोंदी पालघर मधील पक्षी मित्रांकडे आहेत. शा देशी-विदेशी स्थलांतरित पक्षाच्या ठिकाणांचे जतन करणे गरजेचे असल्याचे पक्षी मित्रांकडून सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :