तोडगा काढण्यासाठी ST कर्मचारी तयार; सरकारनं चर्चेसाठी बोलवावं, मात्र विलिनीकरणावर ठाम
संपावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार आहे. सरकारने चर्चेसाठी आम्हाला बोलवावं अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
मुंबई : चर्चेसाठी आम्ही तयार असून, राज्य सरकारनं आम्हाला बोलवावं, अशी भूमिका आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या संपावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आम्हालाही या मुद्यावर तोडगा निघावा असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रथमच आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सामंजस्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधीमंडळात बडतर्फच्या कारवाया मागे घेणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर एबीपी माझाने आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनिल परब हे ज्या दिवसापासून संप सुरू झाला आहे, तेव्हापासून निलंबन, बडतर्फ याशिवाय काही बोलतच नाहीत. या संपावर तोडगा काढण्यासाठी ते कोणताही प्रयत्न करत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आता कारवाया करु नका, जसे जालीयनवाला बाग हत्याकांड झाले, तसे आझाद मैदान हत्याकांड करा, आम्हाला संपवून टाका. तेही जमत नसेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, आम्ही तयार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या.
आम्ही दुधखुळे नाही
एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले जात असल्याचं बोलल जातय, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना विचारला असता, त्यांनी सांगितले की, आम्ही दुधखुळे नाही आहोत. आम्ही सगळे जण शिकलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला कोणीही भडकवत नाही. आम्ही आमच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले. आमच्यावर जी कारवाई करायची ती करा, आम्ही भीत नाही. हवं तर शिवसेना भवनासमोर आम्हाला फाशी द्या, कारण मेलेलं कोबंड आगीला भीत नसते असे एका कर्मचाऱ्याने यावेळी सांगितले.
न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल
न्यायालय आम्हाला जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असेही एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकार म्हणते समितीचा निर्णय आल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही. मात्र, तोडगा काढण्यासाठी अनिल परब काहीच करत नसल्याचे कर्मचारी म्हणाले. मंत्री अनिल परब हे तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत नसून, प्रकरण चिघळण्यासाठी कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: