Coronavirus | ठाण्यात कळवा, मुंब्रा कोरोनाचे हॉटस्पॉट, आतापर्यंत 29 जणांना कोरोनाची लागण
ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा परिसरात आतापर्यंत कोरोनाचे 29 रुग्ण आढळले आहेत, तर एकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही परिसर ठाण्यातील कोरोनाची हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत.
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा आणि मुंब्रा हे दोन प्रभागामध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरतो आहे. आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण याठिकाणी सापडले आहेत. फक्त या दोन विभागात 29 रुग्ण आढळून आल्याने ठाणे महापालिका क्षेत्रात दोन प्रभाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.
कोविड 19 चा प्रसार हा दाटीवाटीच्या वस्तीमध्ये सर्वाधिक होतो. त्यामुळेच कळवा आणि मुंब्रा या दोन प्रभागात ठाणे महानगरपालिकेकडून खबरदारी घेण्यात येते होती. मात्र कोरोना व्हायरसने या दोन प्रभागात हळूहळू शिरकाव करत आता मोठा धोका निर्माण केला आहे. सर्वात पहिल्यांदा कळवा या विभागात बाहेरच्या देशातून आलेल्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हळूहळू खारेगाव, विटावा, पारसिक नगर, मनिषा नगर अशा वेगवेगळ्या विभागातून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. आता केवळ कळवा विभागात कोरोनाचे तब्बल 14 रुग्ण आहेत.
दुसरीकडे मुंब्रा या विभागात अतिशय जास्त दक्षता घेऊन देखील आता ठाण्यातील सर्वाधिक रुग्ण याच विभागात सापडले आहेत. तब्बल 15 रुग्ण या विभागातून आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंब्रा या विभागात सतत होत असणारी गर्दी आणि लोकांचा निष्काळजीपणा या वाढलेल्या रुग्णांसाठी कारणीभूत आहे. तर याच विभागात आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे.
पोलीस अधिकाऱ्यालाही कोरोना व्हायरसची लागण
आणखी धक्कादायक बाब उमरा विभागात घडली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला देखील कोविड 19 ची बाधा झाल्याचे काल निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या पोलिसाच्या संपर्कात आलेले राजकीय नेते, व्यापारी, इतर पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि सामान्य नागरिक याची शोधाशोध आता सुरू झाली आहे. या सर्व कारणांमुळे कळवा आणि मुंब्रा याच विभागात सर्वाधिक लोकांचे विलगीकरण देखील करण्यात आले आहे. अजूनही कडक उपायोजना न केल्यास परिस्थिती गंभीर आणखी होऊ शकते.
संबंधित बातम्या
- राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ
- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावीच्या उर्वरित पेपरसह नववी, अकरावी परीक्षा अखेर रद्द
- मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सात वर; 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण सात वार्डमध्येच
- राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ