Nanded : जाळ्यात पाय अडकला अन् मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना
Nanded Mukhed News : मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोघांचा पाय जाळ्यात अडकला. त्यामध्ये एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा बेपत्ता आहे.
नांदेड : मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर काळाने घाला घातला. जाळे टाळण्यासाठी तळ्यात उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघजण बुडाले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गडग्याळवाडी येथे शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. दोन तरुणापैकी संतोष हणमंतराव मामीलवाड (वय 27) यांचा मृतदेह सापडला असून अजित विश्वाबंर सोनकांबळे (वय 23) याचा रेस्क्यू टीमकडून शोध घेतला जात आहे.
जाळ्यात पाय अडकून मृत्यू
मुखेड येथील तरुण अजित विश्वाबंर सोनकांबळे आणि गडग्याळवाडीचा संतोष हणमंतराव मामीलवाड हे दोघे 18 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता गडग्याळवाडी येथील तलावात जाळे घेऊन मासे पकडण्यासाठी गेले होते. दोघेही कपडे, चप्पल आणि मोबाईल काढून तळ्याच्या पाळूवर ठेऊन पाण्यात उतरले. मासे पकडत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसरा बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे.
घटनेची माहिती मामीलवाड यांचे नातेवाईकांना कळताच त्यांनी तलाव गाठून पोलिसांना कळवले. तहसीलदार राजेश जाधव, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलिस कर्मचारी व्यंकट जाधव, रुकेश हासुळे, तलाठी यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची पाहणी केली. सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले. या टीमच्या माध्यमातून त्या दोन तरूणांचा सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शोध घेण्यात आला.
या शोधमोहीमेत गडग्याळवाडी येथील रहिवाशी असलेला युवक संतोष हणमंतराव मामीलवाड याचा मृतदेह पायात मासे पकडण्याच्या जाळीत अडकलेल्या अवस्थेत सापडला. त्याचा मृतदेह शवच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पाठवण्यात आला. मात्र त्याच्यासोबतचा दुसरा तरूण अजित सोनकांबळे याचा अद्याप पत्ता लागला नाही. सध्या ही शोधमोहीम थांबविण्यात आली असून सोमवारी पुन्हा सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेने सोनकांबळे आणि मामीलवाड कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
ही बातमी वाचा: