LIVE UPDATES | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या
'नितीन, भारत माता की जय म्हणणारे..' आईच्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन बंदुकीचा धाक दाखवत जळगाव कारागृहातून पलायन, चार महिन्यांनी आरोपी जेरबंद मध्य प्रदेशच्या आमदाराचं जेवणाचं निमंत्रण विद्या बालनने नाकारलं; 'शेरनी'च्या टीमला गेटवरच अडवलं आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा! दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन झाले आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात भालेराव यांना वीरमरण आले होते. डोळ्यात पाणी आणि नितीनला सलामी देत 'नितीन भारत माता की जय म्हणणारे' अशी हाक नितीन यांच्या आईने देताच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. नितीन यांची चिमुकली वेदांगी हिने देखील आपल्या वडिलांना सलामी देताच स्मशानभूमीत यावेळी एकच शांतता पसरली होती. लहान भाऊ सुयोग भालेरावने शहीद नितिन भालेराव यांना मुखाग्नी दिला.
आज दुपारी रायपूरहून त्यांचे पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आले होते. त्यांनतर नाशिक शहरातील राजीवनगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले होते. भालेराव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. राजीवनगरपासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होऊन साईनगर चौफुली, द्वारका मार्गे अमरधामला पार्थिव नेण्यात आले. राज्य राखीव दलाच्या जवानांकडून त्यांना सलामी देण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, राज्य राखीव दलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्तांसह ईतर शासकीय अधिकारी आणि भालेराव कुटुंबाकडून नितीन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
बंदुकीचा धाक दाखवत जळगाव कारागृहातून पलायन, चार महिन्यांनी आरोपी जेरबंद
जळगाव कारागृहात असताना बंदुकीचा धाक दाखवत पलायन केलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. सुशील मगरे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस दलात असताना दरोड्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं आढळल्याने त्याला बडतर्फ करुन जळगावच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
25 जुलै 2020 रोजी सकाळी सुशील मगरेने कारागृहातील अन्य तीन कैद्यांच्या मदतीने कारागृहाच्या गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवत, साथीदारांसह पलायन केलं होत. या घटनेनंतर त्याच्यासोबत असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. मात्र बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेला आणि दरोड्यात सहभागी असलेल्या सुशील मगरे मोकाट असल्याने पोलीस खात्यावर मोठी टीका झाली होती. त्यातच मुळात गुन्हेगारी जगताशी हातमिळवणी केलेल्या सुशील मगरेकडून अजून गंभीर गुन्हे होण्याची शक्यता पाहता त्याला पकडणं आवश्यक होतं.
मध्य प्रदेशच्या आमदाराचं जेवणाचं निमंत्रण विद्या बालनने नाकारलं; 'शेरनी'च्या टीमला गेटवरच अडवलं
सध्या विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या शेरनी चित्रपटाचं चित्रिकरण मध्यप्रदेशच्या गोंदिया भागात चालू आहे. तिथे बालाघाट टायगर फॉरेस्टमध्ये विद्यासह सिनेमाची टीम चित्रिकरणासाठी गेली होती. त्यावेळी मध्यप्रदेशचे आमदार विजय शाह यांनी विद्या बालनला रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केलं. पण विद्याने त्याला नकार दिल्यानंतर घडलेला हा प्रकार समोर आला आहे. शेरनीचं तिथलं शूट संपल्यानंतर ते युनिट परतल्यानंतर हा घडला प्रकार समोर आला आहे. संबंधित आमदार मात्र या घडल्या घटनेला नकार देत आहेत.
घडलं असं की, विद्या बालन काही दिवसांपासून शेरनी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातला काही भाग बालाघाटच्या व्याघ्र प्रकल्पात शूट होणार होता. त्यासाठी चित्रपटाच्या टीमने सर्व परवानग्या काढल्या. 30 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर असं याचं शूट ठरलं. त्यानुसार विद्या चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये आली. त्यानंतर 8 आणि 9 नोव्हेंबरला आमदार विजय शाह यांनी विद्यला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार 8 तारखेला सकाळी 11 ते 12 या वेळेत ही भेट ठरली. परंतु, हे आमदार महोदय विद्याला भेटण्यासाठी आले ते संध्याकाळी पाच वाजता. तिथे भेट झाल्यावर शाह यांनी विद्याला रात्री जेवणासाठी निमंत्रित केलं. पण विद्याला त्याचवेळी महाराष्ट्रातल्या गोंदिया येथे परतायचं होतं. त्यामुळे तिने हे निमंत्रण स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा या चित्रपटाचं युनिट चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये गेलं तेव्हा त्यांना गेटवरच आडवण्यात आलं. सर्व परवानग्या असूनही या सिनेमाच्या टीमला आत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्याच्या युनिटला तिथल्या डीएपओच्या टीमने थांबवलं होतं. पण बड्या अधिकाऱ्यांनी फोनाफोनी करून सूचना केल्यानंतर डीएफओने या टीमला आत सोडण्यास सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्य सचिवांना यासाठी फोनफोनी करावी लागली.
आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!
मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प होते. तसे जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. याच आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला यंदा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येतोय. या बाजारात मेंढ्या, जनावरांबरोबरच तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा विक्रीसाठी आला होता. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. बाजारात या बकऱ्याला 70 लाखाची मागणी आली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. आटपाडीत पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येत आहे. रविवारी मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ, पशुपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली.