नवी दिल्ली : देशात आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव थांबावा याकरिता कोरोनाविरोधातील लस राज्यातील सर्व तरुणांना मिळावी म्हणून लसीकरणासाठी असणारी वयाची अट शिथिल करून 25 करावी अशी  मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे देशातील डॉक्टरांची अग्रणी असलेली संस्था इंडियन मेडिकल असोसिएशन  यांनी लसीकरणासाठी देशभरात वयाची अट 18 इतकी करावी अशा मागणीचे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लसीकरसाठी वयाची अट असून नये असं सूचित केलंय. यामुळे आता देशात आणि राज्यात वयाची अट न ठेवता सरसकट लसीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे.      


कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक राज्यात वाढत असताना कोरोना या आजाराविरोधातील एकमेव शस्त्र 'लस' अनेकांना हवी आहे. मात्र वयाची अट असल्यामुळे अनेक तरुणांना लस घेताना अडचणी येतात. सध्याची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात तरुणांना कोरोनाची बाधा होत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णाच्या 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस राज्यातील जनतेला मिळणे अपेक्षित आहे. सध्या या वयोगटात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण आढळून येत आहे त्यामध्ये तरुण आणि चिमुकल्यांचा समावेश अधिक असल्याचे दिसून आलं आहे. 


मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून विनंती केलीय की, "महाराष्ट्रात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु असून 4 एप्रिलपर्यंत 76 लाख 86 हजार व्यक्तींना लस दिली असून लसीकरणाच्या मोहिमेत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सहा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून त्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर यांचा समावेश या जिल्ह्यातील लसीकरण अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी अतिरिक्त लसीची आवश्यकता असून लसीच्या पुरवठ्याबाबत विनंती केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लसीकरणाची वयाची अट 25 वर्ष करावी त्यामुळे ह्या लसीकरणाचा फायदा मोठ्या प्रमाणात तरुणांना होऊ शकेल.", अशी विनंती केलीय. 


राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने बुधवारी 31 मार्च रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत जेव्हापासून कोरोनाची साथ महाराष्ट्रात सुरु झाली. त्यामध्ये वयोगटानुसार बाधितांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, सध्याच्या काळात कोरोनाने तरुणाईला लक्ष्य केले आहे, 0 ते 10 वर्ष - 87,105 11 ते 20 वर्ष - 1,82,656, 21-30 वर्ष - 4,58,945, 31 ते 40 वर्ष - 5, 87, 150, 41 ते 50 वर्ष - 4,98,021, 51 ते 60 वर्ष - 4,44,930, 61 ते 70 वर्ष - 3,04.892, 71 ते 80 वर्ष - 1,47,489, 81 ते 90 वर्ष - 42,141 , 91 ते 100 वर्ष 5, 342, 101 ते 110 वर्ष - 143 नागरिक बाधित झाले आहेत. या सर्व वयोगटांमध्ये 31 ते 40 वर्ष वयोगटात बाधित होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 21.28 % इतके आहे. शिवाय लहान मुलांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे, वर्षाभरापूर्वी हे प्रमाण कमी होते. यामुळे लसीकरण मोहिमेत तरुणांना सामावून घेतले पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. कोरोना लागण होण्याचं प्रमाण 31 ते 40 या वयोगटात सर्वाधिक असूनही त्यांना सध्याच्या वयाच्या निकषांमुळे कोरोना लस मिळत नाही.          
   
याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव डॉ. जयेश लेले यांनी सांगितले की, "देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा  प्रसार होत आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणासाठी असणारी वयाची अट शिथिल करून 18 वर्षावरील सर्वाना ही लस सरसकट द्यावी. त्याकरिता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची एक लाखांपेक्षा जास्त नर्सिंग होम देशभरात आहेत. त्यांना लसीकरणाच्या मोहीमेत सहभागी करून घ्यावे. आम्ही लसीकरणाचे काम करण्यास मदत करू. प्रगत देशात 30-40 टक्के लसीकरण झाले आहे. आपल्या देशातील लसीकरणाचा आकडा खूप कमी आहे. त्याकरिता जास्तीत जास्त तरुणांना या मोहिमेत  सहभागी करून घ्यावे, अशी विनंती पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.        


राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत असताना, 1 एप्रिल रोजी, तरुणांना लस द्या! या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात, 45 वर्षांपुढील सर्वाना आता लसीकरणाची मुभा देण्यात आली असून अधिकाधिक नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. शासनानेही लसीकरण मोहीमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान, ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्या वेगाने लसीकरण व्हावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. टप्प्या-टप्प्याने लसीकरण न करता आता 18 वयावरील सरसकट तरुणांना लस देण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण ज्यावेळी फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून 20 ते 45 वयोगटातील अधिक तरुणांना या आजाराचा संसर्ग पाहायला मिळत होता. कारण ही तरुण मंडळी नोकरी कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेर पडत असतात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा ते वापर करीत असतात. त्यामुळे ते अनेकदा लक्षणविरहित असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळत नाही. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही. हेच तरुण घरी येऊन परत घरातील वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग पसरवतात. त्यामुळे आता लसीकरणासाठी असे कोणतेही टप्पे न ठेवता 18 वर्षावरील सर्व तरुणांना लस घेण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी, असं मत या लेखातूनही व्यक्त केलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :