दोन वर्षांपूवी केरळ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील 14 पैकी 12 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला होता आणि तेथील लोकांचं जीवन अस्त-व्यस्त झाले होते. अनेक गावं पाण्याखाली आली होती, अनेक लोकांना शेल्टर होम मध्ये ठेवण्याची वेळ आली होती. तेथील लोकांच्या आरोग्यावर उपचार करण्याकरिता, महाराष्ट्राने खासगी आणि शासकीय 100 डॉक्टरांची टीम हवाई दलाच्या मदतीने विशेष दोन विमान घेऊन केरळ मध्ये जाऊन 10 दिवस राहून तेथे मोठे मदत कार्य केले होते. आता या कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने केरळ राज्यांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत मागितली आहे. आता येत्या काळात केरळ मधून किती डॉक्टर आणि नर्स आपल्या राज्यात येतात ह्याची वाट पाहावी लागणार आहे. आरोग्यच्या बाबतीत दोन राज्यामधील नातं तसं पहिला गेलं तर सौदार्हपूर्ण आहे,असे म्हणण्यास हरकत नाही.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विशेषतः राज्यातील मुंबई आणि पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत आहे. रुग्णालयातील बेड्सची संख्या अपुरी पडत असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालये कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात उभारली जात असून येत्या काही दिवसात 10 हजारापेक्षा जास्त बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णालयातील रुग्णाची काळजी घेण्याकरिता त्या-त्या हॉस्पिटल मधील डॉक्टर आहेत. मात्र अशा पद्धतीने अचानकपणे उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्य बळाची गरज असून त्याकरिता राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने थेट केरळ राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून काही डॉक्टर्स आणि नर्स महाराष्ट्रात पाठवावे याकरिता साकडे घातले आहे.


वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावे म्ह्णून महापालिकेने मुंबई शहरातील विविध भागात जी तात्पुरती रुग्णालये उभारली आहे, तेथेच त्यांनी काही ठिकाणी अति दक्षता विभागातील बेड्स आणि ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टराची गरज आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे पुरेसे डॉक्टर आहे, मात्र भविष्यात जर रुग्ण संख्या वाढली तर तरतूद असावी बहुदा याच हेतूने शासनाने काही डॉक्टर आणि नर्सची मागणी केली असावी. हे पत्र लिहिण्यापूर्वी तेथील डॉक्टरांशी वैद्यकीय शिक्षण विभागाचं बोलणं झाल्यावर सकारत्मक प्रतिसाद आल्यावर विभागाने हे पत्र केरळच्या आरोग्य मंत्र्यांना लिहिलं आहे. तसेच डॉक्टरांना योग्य तो मोबदला आणि त्यांची सर्व काळजी घेतली जाईल असेही सूचित करण्यात आले आहे. ज्या डॉक्टरांबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागाचं बोलणं झाले आहे ते एका डॉक्टरांशी संबंधित बिगर शासकीय संस्थेत काम करीत असून त्या संस्थेचे नाव 'डॉक्टर्स विदाआऊट बॉर्डर्स' असे आहे. ही संस्था ज्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या उदभवतात त्या ठिकाणी या संस्थेचे डॉक्टर्स जाऊन सेवा देत असतात.



2018 सालात ऑगस्ट महिन्यात, पूरग्रस्त केरळवासीयांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे आणि बळकटी देण्याचे काम महाराष्ट्राच्या सह्याद्रीने केले आहे. कशाचीही तमा न बाळगता 100 तज्ज्ञ डॉक्टरांची फौज केरळ मध्ये दाखल झाली होती. महत्वाचे म्हणजे असे पुढाकार घेऊन आरोग्य सेवा देणारे देशातील एकमेव राज्य होते. त्याचवेळी 3-4 ट्रक इतका औषधसाठा महाराष्ट्रातून या देवभूमीवर उतरविला होता. त्यावेळीचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, डॉक्टरांच्या टीम सोबत ते सुद्धा उपस्थित होते. याबाबत त्यांनी सांगितले की, "आरोग्याचं संकट कोणत्याही राज्यावर कधीही उद्भवू शकतं, अशा वेळी जेवढी शक्य आहे ती मदत इतर राज्यांनी केली पाहिजे."


सध्या महाराष्ट्र राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करण्याकरिता खासगी सेवेतील डॉक्टरना मदत करण्याचं आवाहन करीत आहे, त्याला काही अंशी यश देखील प्राप्त झाले आहे. काही दिवसापूर्वीच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लष्करातील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले तसेच आरोग्य संबंधित प्रशिक्षण घेऊनही हॉस्पीटलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नोकरीपासून दूर राहिलेल्यांनी सध्याच्या संकटात पुढे येण्याची गरज आहे असे आवाहन केले होते. तसेच जे कुणी निवृत्त सैनिक आहेत ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे. अनेक निवृत्त परिचारिका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय सहाय्यकाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल अशा लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असेही सांगितले होते. त्याकरिता खास त्यांनी 'कोविड योद्धा' या नावाने राज्य सरकारने एक इमेल आयडी तयार करून माहिती ही मागितली होती. याचा पुनरुच्चर मुख्यमंत्र्यानी केला असून आता अजून जे कुणी डॉक्टर सेवा देत नसतील त्यांनी समाजहिताकरिता पुढे येणे गरजेचे आहे.


संपूर्ण देशात पहिला रुग्ण या केरळ राज्यामध्ये सापडला असून, या महाभयंकर आजाराला अटकाव घालण्याचा मान पण याच राज्याला मिळणार आहे. विशेष म्हणजे केरळ राज्यात कोरोनाबाधितांचा 1 मे रोजी एकही रुग्ण आढळलेला नाही. त्याचप्रमाणे सध्या जे रुग्ण या राज्यातील विविध रुग्णालयात आहेत त्यांची सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. यामुळे केरळ राज्य अभिनंदनास पात्र आहे. या सर्वांचं श्रेय जाते तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, लोकांचा सकारात्मक सहभाग, प्रशासनावर असलेला विश्वास आणि नियमांचं कडक पालन आणि शिस्त. खरं तर केरळ राज्याचा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेला असणारा प्रवास सध्याचा घडीला आदर्श म्हणून बघता येईल. या राज्यात 847 रुग्ण असून त्यापैकी 521 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहे, तर 4 जण या आजारामुळे मृत झाले आहे.


नैसर्गिक आपत्ती किंवा आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात सर्वच राज्यांनी एकमेकांना मदत करणं हे अपेक्षित असून आपल्या देशात अनेक वर्षांपासून हे चालत आले आहे . मानवी दृष्टिकोनातून जे शक्य होईल ती मदत केल्याने संबंध दृढ तर होतातच मात्र संपूर्ण देश एकसंध राहण्यास मदत होते. उद्या जर आपल्या शहरावरील हे संकट वाढले आणि देवभूमीतील डॉक्टर आले तर त्यांचे स्वागतच आहे, त्याचा सह्याद्रीला नक्कीच फायदा होईल.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग