कोरोनाचा संकट अधिक गडद होता असताना महाराष्ट्र सध्या उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे, उष्णतेचा वाढलेला पारा लोकांचे हाल बेहाल करीत आहे. या सगळ्या प्रक्रियेत प्राणाची बाजी लावून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पी पी ई ) किट - स्वयं सरंक्षक पोशाख घालून काम करीत आहे, याचा त्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवत असला तरी तक्रार न करता अनेक डॉक्टर आपली आरोग्य सेवा रुग्णांना देत आहे. राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून उन्हाच्या झळांचा लोकांना त्रास जाणवत आहे. पी पी ई किट परिधान करुन काम करणाऱ्या डॉक्टरांना याचा अधिक त्रास होऊ नये याकरिता मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेच्या नाविन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ज्ञ यांनी यावर प्रभावी उपाय शोधला आहे .भारतीय कापडापासून तयार करण्यात आलेल्या नौदलाच्या 'नवरक्षक' पीपीई मुळे वैद्यकीय आणि आरोग्य व्यावसायिकात नवी उमेद निर्माण झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या दृष्टीकोनातून हा पीपीई सूट तयार करण्यात आला आहे. देशातील सर्व डॉक्टरांना नवरक्षक' पीपीई किट मिळाले तर त्यांचा त्रास कमी करण्यास नक्कीच मदत होईल.

कोरोनाचं आजाराचा मुकाबला करण्यासाठी विशेषतः कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता डॉक्टरांनी पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर केला नाही तर त्यांना स्वतःला या विषाणूची बाधा होण्याचा धोका संभवू शकतो. या आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पीपीई परिधान करणे अतिशय महत्वाचे ठरते. पीपीई मुळे कोरोनाच्या विषाणूशी संपर्क होण्याचा धोका कमी असतो. मात्र अनेक थर असलेला पीपीई किट परिधान करून कोरोनाच्या रुग्णावर उपचार करणे आणि उष्ण आणि दमट हवामानात 8 ते 12 तास काम करताना या डॉक्टरांना होणाऱ्या त्रासाची कल्पना करणेही अशक्य आहे. डॉक्टरांची आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. फक्त पीपीई किट दिले म्हणजे होत नाही तर त्यामध्ये डॉक्टर व्यवस्थितपणे काम करू शकतात कि नाही याचा विचार व्हायला पाहिजे.

मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेच्या नाविन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ज्ञ असलेले घोष यांनी हे पीपीई किट तयार केले असून ते स्वतः एक डॉक्टर आहे. त्यांच्या मते 'नवरक्षक' म्हणजे अद्भुत संरक्षक, याची दोन वैशिष्ट्ये आहेत, जास्तीत जास्त संरक्षण आणि जास्तीत जास्त हवेशीर. पीपीई तयार करताना प्रत्येकजण पाणी, रक्त, रुग्णाच्या शरीरातले द्राव यांना प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या साहित्याचा विचार करतो मात्र पीपीई वापरणाऱ्या व्यक्तीसाठी तो सुखकर किंवा त्याला हवेशीर कसा ठरेल यावर फारच कमी लक्ष पुरवले जाते.

पत्र सूचना कार्यालया मार्फत काढण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार , याबाबत डॉ. घोष सांगतात की, भारतीय बाजारात उपलब्ध असलेले बरेच पीपीई हवेशीर या पैलूकडे दुर्लक्ष करणारे आहेत . कमी आणि दुय्यम दर्जाच्या पीपीईचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्य कर्मचारी लगेच थकतो. हवेशीर म्हणजे बाष्प जाऊ देण्याची आणि पाण्याला आत शिरण्यासाठी प्रतिबंध करण्याची त्या वस्त्राची क्षमता. वस्त्राची सुखकरता ही शरीरातले बाष्प बाहेर जाऊ देऊन शरीरावर द्रव जमा होऊ देण्यासाठी प्रतिबंध करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. नवरक्षकने विणलेले अत्याधुनिक दर्जाचे कापड वापरून, विशिष्ट जीएसएम आणि विशिष्ट तंत्राने शिवलेले आहेत.यावस्त्राचे वैशिष्ट म्हणजे मजबूत एकसमान बांधणी जी,द्रव, रक्त, शरीरातले द्राव यांना उत्तम प्रतिरोध करते. हा पीपीई तयार करण्यासाठी सात दिवस लागले .यासाठी कापडाच्या विस्तृत प्रकारांवर व्यापक संशोधन आणि ग्लोव तसेच यासारख्या इतर वैद्यकीय उपयोगाच्या साधनांचा अभ्यास करावा लागला.लॉक डाऊनमुळे कच्चा माल मिळवणेही कठीण होते.संशोधनानंतर मला हे नवे तंत्रज्ञान सापडले".

ते पुढे असेही सांगतात की, मुंबईतल्या नौदलाच्या गोदीत या पीपीईची प्रायोगिक तत्वावर निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेचा नाविन्यता विभाग आणि मुंबईतली नौदल गोदी यांनी संयुक्तपणे याचे आरेखन आणि निर्मिती केली आहे.नव्या तंत्रज्ञानाची आयएनएमएएसने चाचणी घेतली आहे. पीपीईने 6/6 सिंथेटिक ब्लड पेनिट्रीएशन रेझीस्टन्स या रक्त आत शिरण्याला प्रतिबंध करण्या संदर्भातली चाचणी पार केली आहे. मोठ्या प्रमाणात निर्मितीसाठी आणि कोविड च्या सध्याच्या परिस्थितीत त्याचा वैद्यकीय वापर करण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. या उपक्रमात खरेदी आणि शिलाई यासारख्या कामात नौदल गोदी भागीदार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मानक अनुसरत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मानकांना अनुसरून याची निर्मिती करण्यात आली आहे. उष्ण आणि दमट वातावरणात दीर्घकाळ वापर करूनही हा पीपीई सुखकर ठरतो आणि तो किफायतशीर आहे.पीपीपी तयार केल्यानंतर तो परिधान करून मी स्वतः2-3 तास पंखे बंद करून, डॉक्टर या स्थितीत किती काळ सुखकर पणे काम करू शकतात याची चाचणी घेतली आहे".

राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक, सांगतात की, "पीपीई परिधान करण्यापूर्वी डॉक्टरांनी सुती किंवा मलमल कपडे परिधान करावे त्यानंतर पीपीई किट परिधान करावे त्यामुळे शक्यतो त्रास कमी होईल."

भारतीय नौदलाने विकसित केलेल्या या कल्पक आणि माफक खर्चाच्या पीपीई चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या आयपीएफसीने (स्वामित्व हक्क मिळविण्यासाठी मदत करणारा विभाग ) पेटंट अर्थात स्वामित्व हक्क घेण्यासाठी आधीच अर्ज दाखल केला आहे.या पीपीई कीट करिता न विणलेले अत्याधुनिक दर्जाचे कापड वापरून ते एका विशिष्ट तंत्राने शिवलेले आहे. या किटची एकसमान बांधणी जी,द्रव, रक्त, शरीरातले द्रव यांना दूर ठेवते.

दिवसागणिक कमाल तापमान वाढत जाईल अशा काळात नवरक्षक पीपीई हा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी वरदान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग