मार्च 2020 मध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात सापडला आणि त्यानंतर कोरोनाबाधितांची सुरुवात झाली आणि त्यानंतर रुग्णांची वाढ इतकी झपाट्याने झाली की ती राज्यातील सगळ्याच जनतेने पाहिली आहे. 2021च्या जानेवारी महिन्यापर्यंत या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त झालं होतं. सध्याच्या घडीला वैद्यकीय पातळीवर कोरोनाच्या रुग्णांना उपचार देणे शक्य आहे. मात्र, या आजाराचा वाढता संसर्ग रोखणे हे राज्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेपुढील मोठं आव्हान आहे. कारण फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटच्या आठवड्यात ज्या वेगाने या आजाराच्या संसर्गाचा आकडा वाढत आहे, त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होण्याकरिता सर्वसाधारण 14 दिवस लागतात. गेली तीन दिवस राज्यात रोज नव्याने 8 हजारापेक्षा अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे, जर ही वाढ अशीच होत राहिली तर भविष्यात अधिक धोके संभवतात. त्यामुळे या आजाराला न घाबरता, सतर्क राहून सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे काम आता नागरिकांना करावे लागणार आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा रात्रं-दिवस काम करत कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत असून रोज हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. मात्र, त्याचवेळी रोज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक प्रमाणात लक्षणीय स्वरूपात नवीन रुग्णांचे निदान होत आहे. हा प्रकार असाच चालू राहिला तर या आजाराला पायबंद घालण्यासाठी अजून किती काळ लागणार आहे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे.


जोपर्यंत नवीन रुग्णाच्या संख्येवर आळा घालण्यात यश मिळत नाही तोपर्यंत ही लढाई निरंतर चालूच राहील सध्या अशी परिस्थिती आहे. घनदाट लोकवस्ती असलेल्या मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात तसेच विदर्भातील काही भागात दिवसागणिक नवीन रुग्णाचं आगमन होतंच आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला असून तेथे रुग्णाची आकडेवारी जास्त नसली तरी काही प्रमाणात रुग्णसंख्या दिसतच आहे. वाढती रुग्णसंख्या थांबविण्यासाठी या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाला रोखणं गरजेचं आहे. तो थांबवायचा कसा? ह्या प्रश्नाचं उत्तर अजून जरी मिळालं नसलं तरी त्यावर मात कशी करायची यावर प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते स्वयंशिस्त आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे, यामुळे प्रादुर्भाव कमी होणार आहे. सुरक्षिततेच्या नियमांची उजळणी दरवेळीच प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा करत असते. बहुतांश नागरिकांना सर्व नियमांची व्यवस्थित माहिती आहे. आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि रुग्णबाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. बाधित रुग्ण बरे होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान, तेही बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा दुपटीने होणे ही चिंताजनक बाब आहे हे आपण येथे ध्यानात घेतले पाहिजे. राज्याचा आरोग्य विभाग दररोज मेडिकल बुलेटिन जारी करत असतो, त्यानुसार शुक्रवारी जी आकडेवारी जाहीर केली होती त्याप्रमाणे 4936 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे आणि 8333 नवीन रुग्णांनाच निदान झाल्याचं सांगण्यात आलं आहे, यावरून नवीन रुग्णांची आकडेवारी वाढत आहे.


शासनाच्या आकडेवारीनुसार,




  • 20 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 6281, बरे झालेले रुग्ण 2867,

  • 21 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 6971, बरे झालेले रुग्ण 2417,

  • 22 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 5210, बरे झालेले रुग्ण 5035,

  • 23 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 6218, बरे झालेले रुग्ण 5869,

  • 24 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 8807, बरे झालेले रुग्ण 2772,

  • 25 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 8702, बरे झालेले रुग्ण 3744,

  • 26 फेब्रुवारी नवीन रुग्ण 8333 बरे झालेले रुग्ण 4936,
    अशा पद्धतीने रोज राज्यात रुग्ण वाढ होत आहे.


याप्रकरणी राज्याचे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे सांगतात की, " साथीच्या आजारात प्रत्येक आजाराचं एक गतीशास्त्र असतं. तसेच आपण या आजारात आर नॉट नंबर (बेसिक रिप्रॉडक्शन नंबर) म्हणजे प्रसारांक, म्हणजे कोरोनाबाधित रुग्णापासून किती लोकांना हा आजार होऊ शकतो हा आकडा बघत असतो. या आजारात कोरोनाबाधित 1 ते 4 रुग्णांना प्रसार करतो हे गेल्या काही महिन्याच्या शास्त्रीय आधारावरून लक्षात आले आहे. जगभरात हा आजार पसरून एक वर्ष झाले आहे. गोवर आजारात प्रसारक आकडा 11-12 असा होता, म्हणजे तो कोरोनापेक्षा कैकपटीने अधिक होता. कोरोनाबाधितांचा हा आकडा कमी करण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर देणे गरजेचे आहे. त्यापद्धतीने प्रयत्न सुरु झाले आहेत. सध्या विदर्भात प्रसारांकचा नंबर अधिक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आपल्याला ह्या आजाराच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी काही सुरक्षिततेचे नियम आखून दिले आहेत ते पाळणे गरजेचे आहे"


गेल्या काही महिन्यात डॉक्टरांनी या आजाराच्या विरोधात जी काही उपचारपद्धती विकसित केलीय, त्याला रुग्ण उत्तम प्रतिसाद देत आहेत. मात्र, यामुळे नागरिकांमध्ये एक भलताच फाजील आत्मविश्वास वाढला आहे. या आजाराचा संसर्ग झाला तरी बरे होते अशी भावना नागरिकांमध्ये वाढीस लागली असून त्यामुळे नागरिक नियमनाचे पालन फारसे करताना दिसत नाहीत, आणि ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनाला अजिबात हलक्यात घेता कामा नये. कारण गेल्या काही दिवसात राज्यात विषाणूचे नवीन जनुकीय बदल आढळत आहेत. त्यामुळे बदलेला विषाणू किती वेगाने प्रसार करेल हे अजून तरी सांगणे शक्य झालेले नाही.


इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष, डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, " सध्या जी रुग्ण वाढ राज्यात दिसत आहेत ती म्हणजे मोठ्या प्रमाणात एका रुग्णाचे मागे ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे दिसत असल्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणात जे पॉजिटीव्ह रुग्ण सापडत आहेत ते लक्षणविरहित आहेत. विशेष करून सभा, आंदोलने, संमेलन यांचा यामध्ये निश्चितच भर आहे. तसेच ज्या काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये पॉजिटिव्हचे प्रमाण सापडत आहे त्यामुळे ही संख्या वाढलेली दिसत आहे. अशा पद्धतीची वाढ यापूर्वी आपण राज्यात पहिली होती. ही संख्या सध्या जरी मोठी वाटत असली तरी प्रतिबंधात्मक उपायांमुळे ही वाढ भविष्यात थांबविणे शक्य आहे. त्यासाठी मात्र प्रशासनाने ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूचीचा वापर करत राहणे गरजेचे आहे. "


फेब्रुवारी 25 ला, 'कोरोनाबाधितांची 'शाळा' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजेच गेल्या वर्षी कोरोनाचा हाहाकार सर्वत्र देशात होता. त्यावेळी तरुण आणि ज्येष्ठ व्यक्तींना या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. त्यावेळी लहान मुलांना कोरोनाची लागण फार होत नाही, त्याची प्रतिकार शक्ती चांगली असते असा समज तयार झाला होता. वैद्यकीय क्षेत्रातून यावर ठोस अशी प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र, या वर्षीच्या फेब्रुवारीच्या महिना संपत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. राज्यातील विविध भागात शाळा झाल्याने विदयार्थी शाळेत जाऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे दिसत असले तरी प्रतिबंधात्मक आणि सुरक्षिततेचे उपाय कमी असल्याचे अधोरेखित होत आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात 0-10 वयोगटातील 2 हजार 384 मुलांना कोरोनाची लागण झाली असून 11-20 वयोगटातील 6 हजार 915 युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील विविध भागात मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांची शाळा भरवत असताना कोरोनाबाधितांची शाळा जर भरणार असेल तर धोक्याची घंटा लक्षात घेऊन आताच शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी कोरोना विरोधातील कडक नियमांची अंमलबजावणी करणे शक्य असेल तर शाळा सुरु ठेवाव्यात अन्यथा काही दिवस शाळा बंद ठेवणे शहाणपणाचे ठरणार आहे.


लवकरच दुसऱ्या टप्प्यात ज्या व्यक्तीचे लसीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक (60 वर्षावरील) आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना सरकारी रुग्णालयात मोफत लस देण्यात येणार आहे. मात्र, हे लसीकरण वेगात आणि सोप्या पद्धतीने व्हावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण मोहिमेत आपला सहभाग नोंदवतील. जितके जास्त नागरिक लवकर लस घेतील तितक्याच पद्धतीने नागरिकांमध्ये 'हर्ड इम्म्युनिटी' निर्माण होण्यास मदत होणार आहे. संसर्ग रोखण्यासाठी ज्या काही उपाय योजना प्रशासन करीत आहे, त्यामध्ये त्यांनी लसीकरण मोहिमेस बळ देण्यासाठी जास्त प्रयत्न करणे फायदेशीर ठरणार आहे. सध्या संसर्ग रोखण्याकरिता प्रशासन विविध करीत आहेत, विदर्भातील काही जिल्ह्यात, शहरात लॉकडाउन घोषित केला आहे. मात्र, याकरिता नागरिकांनी सुद्धा सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून शासनाला सहकार्य केले पाहिजे.