(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाशी लढणाऱ्या आशा स्वयंसेविकांचं आंदोलन; सुरक्षा, वाढीव मोबदल्याची मागणी
राज्यभरात जवळपास 70 हजार आशा स्वयंसेविका आहेत. तर जवळपास साडेतीन हजार गटप्रवतर्क आहेत. या परिस्थितीत स्वयंसेविका जवळपास 80 प्रकारची कामे करत असतात.
सोलापूर : कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत घराघरात जाऊन सर्व्हेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी आजपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा आणि वाढीव मोबदला मिळावा यासाठी आशा स्वयंसेविकांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. 13 मे पर्यंत काम करत असताना हातावर काळ्या फिती लावून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न आशा स्वयंसेवक करत आहेत.
कोरोनाच्या काळात घराघरात जाऊन सर्व्हेक्षण करणे व यासारखी अनेक काम आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक करत आहेत. मात्र त्यांना मोबदला म्हणून अत्यंत तुटपुंजी रक्कम दिली जात असल्याचा आरोप आशा स्वयंसेविकांनी केला. स्वत:सह कुटुंबियांचे जीव धोक्यात घालून काम करत असताना कित्येक वेळा लोकांकाडून चुकीची वागणूक मिळते. अनेकांचे पती किंवा घरातील मंडळी मोलमजूरी करत काम करतात.
लॉकडॉऊनमुळे त्यांची कामे बंद आहेत. अशात संसाराचा गाडा हाकण्यासाठी मानधन न देता महिन्याकाठी ठराविक रक्कम देण्यात यावी. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा सरंक्षण देण्यात यावे, अशी मागणी आशा स्वयंसेवकांनी केली.
राज्यभरात जवळपास 70 हजार आशा स्वयंसेविका आहेत. तर जवळपास साडेतीन हजार गटप्रवतर्क आहेत. या परिस्थितीत स्वयंसेविका जवळपास 80 प्रकारची कामे करत असतात. त्या कामाच्या आधारवर त्यांना मोबदला दिला जातो. या मोबदल्याचा दर जुना असून तो आता वाढवण्याची गरज असल्याचे मत आशा स्वयंसेविकांनी व्यक्त केले. दरम्यान 13 मे पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असून सरकारने गांभीर्यांने या मागण्याचा विचार करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे महासचिव सलीम पटेल यांनी केली.
संबंधित बातम्या
- coronvirus | राज्यात आज 1230 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा संख्या 23,401
- मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Corona Update | देशात आतापर्यंत 20,917 लोक कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 31.15 टक्के : आरोग्य मंत्रालय
- मद्यप्रेमींसाठी खुशखबर; ई-टोकनद्वारे दारुची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुविधा