Corona Population Impact : कोरोनामुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता : रिसर्च
कोरोनाने जगात सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना हा सूक्ष्म विषाणू भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आणखी एक अनावश्यक परिणाम घडवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
नागपूर : कोरोनाचा मानवी जीवनावर कसा आणि कोणता परिणाम होईल हे सांगता येत नाही. आता डोळ्याने न दिसणारा हा विषाणू देशाच्या लोकसंख्यावाढीवर ही परिणाम करू शकतो असा एक अभ्यास समोर आला आहे. महिलांमध्ये सुरक्षित बाळंतपणासाठी जगातील अनेक विकसनशील देशांमध्ये काम करणाऱ्या 'फाऊंडेशन फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस' या संस्थेने हा अभ्यास केला असून त्यामध्ये लॉकडाऊनमुळे येणाऱ्या काही महिन्यात देशाची लोकसंख्या लाखोंनी वाढू शकते असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. शिवाय असुरक्षित गर्भपात आणि त्यामुळे मातामृत्यू दर ही वाढू शकेल अशी भीतीही व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागात कुटुंब नियोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांची कमतरता झाल्यामुळे देशात कोट्यावधी जोडप्यांपर्यंत कुटुंब नियोजनाची साधने पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे लाखो महिलांना इच्छा नसताना लॉकडाऊनमध्ये गर्भधारणा स्वीकारावी लागल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाशी जोडलेल्या तज्ज्ञांनीही अभ्यासातील निष्कर्षांना दुजोरा देत लोकसंख्यावाढीचे हे विपरीत परिणाम टाळायचे असल्यास भविष्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम जोमाने राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
कोरोनाने जगात सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना हा सूक्ष्म विषाणू भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आणखी एक अनावश्यक परिणाम घडवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जगातील 37 विकसनशील देशात महिलांमध्ये सुरक्षित बाळंतपणासाठी काम करणाऱ्या 'फाऊंडेशन फॉर रिप्रोडक्टीव्ह हेल्थ सर्व्हिसेस' या संस्थेने एक अभ्यास केला आहे. 'भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर कोविड 19 चा परिणाम' असा या अभ्यासाचा शीर्षक असून त्यामध्ये धक्कादायक निष्कर्ष मांडण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे जशी इतर अत्यावश्यक साधनांची कमतरता झाली. तशीच कमतरता कुटुंब नियोजन कार्यक्रम परिणामकारकरीत्या राबवण्यासाठी आवश्यक साधनांबद्दल ही झाली आहे आणि त्यामुळे देशाचा कुटुंब नियोजन कार्यक्रम या वर्षी त्यांच्या नियोजित लक्ष्यपेक्षा 20 टक्के मागे राहू शकेल असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांची कमतरता किती प्रमाणात होऊ शकणार आहे.
गर्भ निरोधकाची उपलब्धता 5 कोटीने कमी होऊ शकेल. गर्भ निरोधक गोळ्यांची उपलब्धता 12 लाख 80 हजाराने कमी होऊ शकेल. तर आय पीलसारख्या इमरजेंसी कॉंट्रासेप्टीव्हसची विक्री ही 10 लाखाने कमी होणे शक्य आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही 8 लाख 70 हजाराने कमी होऊ शकतात. कॉपर टी बसवण्याची प्रक्रिया ही 12 लाखाने कमी होऊ शकते असे भाकीत या अभ्यासात व्यक्त केले आहे
या सर्वांचा परिणाम म्हणजे पुढील काही महिन्यात देशात 23 लाख ते 29 लाख महिलांना इच्छा नसताना ही गर्भधारणा स्वीकारावी लागू शकते. यापैकी मोठ्या संख्येने महिला गर्भपाताचा मार्ग स्वीकारू शकतात, त्यामुळे त्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न तर निर्माण होईलच. शिवाय लॉकडाऊन काळातल्या अनैच्छिक गर्भधारणेमुळे लाखोंच्या संख्येने बाळ जन्माला येऊ शकतात असे भाकीत ही या अभ्यासात सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या अनैच्छिक गर्भधारणेतून पुढी काही महिन्यात साडे आठ लाख बालके जन्माला येऊ शकतात असे या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांना ही या अभ्यासात व्यक्त केलेलं भाकीत काही अंशी मान्य आहेत. लॉकडाऊनमध्ये एक तर कुटुंब नियोजनाच्या साधनांची मागणी वाढली आहे आणि त्याच्या तुलनेत त्यांची उपलब्धता नक्कीच कमी झाली आहे. शिवाय कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे आशा वर्कर सारखे अत्यंत महत्वाचे मनुष्यबळ सध्या कोरोनाच्या संदर्भातील सर्वेक्षणमध्ये इतरत्र वापरले जात आहे. विविध सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व नियोजित ( planned operation ) शस्त्रक्रिया सध्या बंद करण्यात आल्या असून त्यामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचा ही समावेश आहे.
दरम्यान, कोरोनामुळे देशाच्या लोकसंख्येवर होऊ शकणारे हे वाढीव परिणाम पुढील काही महिन्यात थांबवणे ही शक्य आहे. तज्ज्ञांच्या मते जरी सध्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांवर बंधने असली तरी भविष्यात त्यांची संख्या वाढवता येऊ शकेल. तसेच गावोगावी कुटुंब नियोजन कॅम्प घेऊन कुटुंब नियोजनाची रुळावरून उतरलेली गाडी पुन्हा रुळावर आणणे शक्य होईल. मात्र, यासाठी सरकारी इच्छाशक्ती महत्वाची ठरणार आहे.
भारताचा कुटुंब नियोजन कार्यक्रम खेडापाड्यांपर्यंत पोहोचला असून गेल्या अनेक दशकांच्या मेहनतीचे फळ लोकसंख्या नियंत्रणाच्या स्वरूपात आता कुठे भेटू लागले असताना, कोरोनाचे हे संकट अनिच्छेने ओढवलेल्या गर्भधारणेसारखे समोर आले आहे. त्यामुळे कटुंब नियोजन कार्यक्रमाची घडी विस्कटली असून भविष्यात जन्म दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी कोरोनाचा संकट हाताळल्यास सरकार पुन्हा कुटुंब नियोजन कार्यक्रमाची गती वाढवून लोकसंख्या वाढीचा धोका टाळण्यात यशस्वी होईल.
Coronavirus Vaccines | देशात कोरोनावर 14 लसींवर काम सुरु : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन