(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole : देवेंद्र फडणवीस यांची गृह खात्यावर पकड नसल्याने रक्षकचं भक्षक झालेत, हे भूषणावह नाही; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole : भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल आणि आंधळगावचे ठाणेदार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
Bhandara News भंडारा : भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर भंडारा पोलीसात (Bhandara Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तर, आंधळगावचे ठाणेदार यांनी एका वृद्ध हॉटेल व्यावसायीकाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 7 जूनला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बागुल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना 24 तासात पोलीस प्रशासनानं जामीन दिला.
यानंतर डॉ. बागुल हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. अशातच भंडारा जिल्ह्याचे एसपी लोहित मतानी यांनी याचा अहवाल त्यांच्या वरिष्ठांकडं पाठविला असून आता आठ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही डॉ. बागुल यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
रक्षकचं जर भक्षक झालेत तर हे भूषणावह नाही- नाना पाटोले
राज्याचे रक्षकचं जर भक्षक झालेत तर हे भूषणावह नाही. पण राज्यातलं सरकार जे आहे, यात सरकारचाच दोष आहे आणि त्यांचे प्रशासनावर कुठेही पकड नाही. महाराष्ट्रातलं भाजप प्रणित सरकार आहे आणि त्यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांचे त्या गृह खात्यावर पकड नाही, हे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. येत्या अधिवेशनात हे सगळे विषय आम्ही मांडू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिलाय.
काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यात न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात बागुल यांच्यावर भंडारा पोलीस (Bhandara Police) ठाण्यात 7 जूनला भादंवी 354 अ (2), 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद असलेल्या पोलीस विभागानं एवढ्या गंभीर आरोपानंतर DYSP बागुल यांना अवघ्या 24 तासात भंडारा पोलीस ठाण्यातून जामिनावर सोडलं असल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
देवेंद्र फडणवीस यांची गृह खात्यावर पकड नाही - नाना पाटोले
गुन्हा दाखल झाल्यानंतर DYSP डॉ. अशोक बागुल हे आता वैद्यकीय रजेवर गेले आहेत. या घटनेचा संपूर्ण अहवाल पोलीस महानिरीक्षकांकडं पाठविला असल्याची माहिती भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली. त्यामुळे आता भंडाऱ्याचा प्रभार तुमसरच्या IPS रष्मिता राव यांच्याकडं सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाला आता आठवडा लोटला तरी अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार ठरवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या