Nana Patole : सर्वांनी बॅगा भरून ठेवा, उद्या आपल्याला दिल्लीला जायचं आहे; नाना पटोलेंचा काँग्रेसच्या खासदारांना संदेश
Mumbai Congress Meeting : लोकसभेच्या यशानंतर आता विधानसभेसाठीही आपल्याला ताकदीने मैदानात उतरायचं आहे, काँग्रेसचा पंजा सगळीकडे दिसला पाहिजे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
मुंबई: राज्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे 13 खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचं दिसतोय. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तयारी करण्याकडे नेत्यांचा कल आहे. याच पाश्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील नेत्यांना एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. सर्वांनी बॅगा भरून ठेवा, उद्या संध्याकाळी आपल्याला दिल्लीला जायचं आहे असं ते म्हणाले. बॅगा म्हणजे कपड्यांच्या बॅगा भरा, एकनाथ शिंदे यांच्यासारखं आपल्याला जायचं नाही अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
मुंबईतील टिळक भवन येथे कांग्रेस नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले हे उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज, विशाल पाटील, यांच्यासह अनेक खासदार बैठकीला उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले की, देशाचं संविधान बदलण्याच काम सुरु होतं ते आपण थांबवलं. या विजयाचं सगळं श्रेय राहुल गांधींना आहे. विधानसभेची तयारी आतापासूनच करायची आहे. उद्या संध्याकाळी आपल्याला 6.30 वाजता पुन्हा दिल्लीला जायचं आहे. दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये देशातील सर्व खासदार असणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी बॅग भरून ठेवा. कपड्याच्या बॅग म्हणतोय मी, एकनाथ शिंदेंसारख्या नाही.
काँग्रेसचा पंजा सगळीकडे दिसला पाहिजे
अमोल कीर्तिकर जिथे उभे होते ती जागा आपली होती. वर्षा गायकवाड यांची जागा आपल्याकडून काढून घेतली. पण जर आम्हाला ती दिली असती तर महाविकास आघाडीला फायदा झाला असता. पण हा लढा अजून संपलेला नाही. आपल्याला आता सुरुवात करायची आहे, ताकतीने विधानसभेला उतरायचं आहे. आता काँग्रेसचा पंजा सगळीकडे दिसला पाहिजे.
विशाल पाटील काल दिल्लीला जाऊन आले, उद्या आपल्याला दिल्लीला जायचं आहे असं नाना पटोले म्हणाले. पण एकनाथ शिंदेंसारखं आपल्याला दिल्लीला जायचं नाही अशीही कोपरखळी त्यांनी मारली.
काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राज्यातील 17 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने 8 जागा मिळवल्या आहेत.
ही बातमी वाचा: