Amravati News : आमचा खासदार मागासवर्गीय, म्हणून ही वागवणूक; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
Yashomati Thakur : आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागवणूक दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
Amravati News: अमरावती : अमरावती खासदार कार्यालय (Amravati MP Office) कुलूप तोड प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसत आहे. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) यांचाही समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावती खासदार कार्यालय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आलं आहे. आता पुन्हा कार्यालय सील केल्यानं नव्यानं वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना, आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागवणूक दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. शिवाय या कट-कारस्थानमागे भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार रवी राणा यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय.
आमचा खासदार मागासवर्गीय,म्हणून ही वागवणूक
लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला लागला. त्यानंतर खासदार कार्यालय संबंधित पत्र संबंधित विभागाला देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील त्यात वारंवार दिरंगाई होताना दिसत होती. त्यानंतर याबाबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना देखील याबद्दल विनंती करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातले इतर प्रश्न ज्याप्रमाणे सोडवू शकत नाही, त्याचप्रमाणे त्यांनी हा ही प्रश्न सोडवला नाही. एखादा समजदार पालकमंत्री असता तर त्यानी वेळीच हा प्रश्न मार्गी लावून हा विषय संपवला असता.
मात्र, असे न होता त्यांनी अतिशय खालच्या पद्धतीने वागणूक आम्हाला दिली. आमचा खासदार हा एक मागासवर्गीय समाजाचा आहे. म्हणून मीटिंगमध्ये देखील त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात. आल्यावर त्यांना खुर्चीही मिळत नाही. खासदार बळवंत वानखडे यांना उभं राहावं लागतं. अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते. शिवाय या कट-कारस्थानमागे आमदार रवी राणा आणि अनिल बोंडे हे या मागचे सूत्रधार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
तर त्यालाही उत्तर दिलेच पाहिजे- यशोमती ठाकूर
अमरावतीतील खासदार कार्यालय हे नवनिर्वाचित खासदारांना देण्यात यावं, असा 2015 मध्ये निर्णय झाला होता. यासंबंधीत जी काही नियमावली काढली होती त्यानुसार वर्धा आणि अमरावती येथील दोन खासदारांसाठी राखीव आहे. मात्,र अद्याप तरी असे झालेले नाही. परिणामी, वारंवार निवेदन आणि तक्रारी करून देखील आम्हाला न्याय मिळत नसेल तर लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे. कालचे जे पाऊल होते ते आम्ही उचलले आणि न्याय मागितला. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्याची आम्हाला परवा नाही.
मात्र केवळ सर्वधर्म समभाव या विचारांची, काँग्रेसची लोक त्या ठिकाणी बसली नाही पाहिजे या विचारतून हे कृत्य झाले आहे. मात्र या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. आज राज्यात तुमची सत्ता आहे. उद्या आमची सत्ता येईल. इथून पुढे पण भरपूर काम करायची आहे. मात्र या कामात जर अशा पद्धतीने अडथळे निर्माण केले जात असतील तर त्यालाही उत्तर दिलेच पाहिजे. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या