एक्स्प्लोर
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार
दरम्यान, एकीकडे हर्षवर्धन पाटील भाजपवासी होणार हे स्पष्ट झालं आहे. पण खासदार उदयनराजे भोसलेचं काय ठरणार आणि नारायण राणेंच्या प्रवेशाचं काय, याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाटील उद्या दुपारी तीन वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडायला तयार नसल्याचं सांगत हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले होते. या मेळाव्यात पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार टीका केली होती. आमच्यावर सभ्यतेचे संस्कार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचा गैरफायदा घेतला. एक नाही तर पाच लोकसभा निवडणुकीत त्यांचं काम केलं. पण आम्हाला काय मिळालं, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा निघाली तेव्हा इंदापूरमधे येणार नव्हती. पण मग अचानक कशी आली. वाघ म्हटलो तरी खातंय आणि वाघोबा म्हटलं तरी खातंय, असे म्हणत इंदापुरातील मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी पवारांवर टिका केली. दरम्यान, एकीकडे हर्षवर्धन पाटील भाजपवासी होणार हे स्पष्ट झालं आहे. पण खासदार उदयनराजे भोसलेचं काय ठरणार आणि नारायण राणेंच्या प्रवेशाचं काय, याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. कोण आहेत हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. काँग्रेसच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव अनेक वेळा आले होते. असे असूनही पक्ष त्यांचा विचार मात्र सध्या करत नसल्याचे त्यांच्या कार्यकर्ते म्हणणे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीत मतदार संघात सुप्रिया सुळे यांना पाटील यांनी मदत केली होती. स्वतः अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांची मनमानी केली होती. शरद पवार यांनीही पाटील यांच्याशी चर्चा केली होती. यात पवार यशस्वी झाले होते. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातील 70 हजारांचे मताधिक्य मिळाले. यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेसचाही मोठा वाटा होता. दरम्यान शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्याच्या विधानसभेची उमेदवारी देणाच्या शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे नाराज झालेले पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 2014 चा अपवाद वगळता 1952 सालापासून इंदापूर तालुक्यावर काँग्रेसची सत्ता ठेवण्यात हर्षवर्धन पाटील व पाटील घराणे सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.
आणखी वाचा























