Online University : महाराष्ट्रात ऑनलाइन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त
महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या सोईसाठी आणि कमी खर्चात दर्जेदार ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी ऑनलाइन विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार सुरु आहे.
मुंबई : देशामध्ये कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात, विद्यापीठांमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी खास ॲप्लिकेशन, विविध पोर्टल्सचा वापर करण्यात येतोय. शिवाय, जे विद्यार्थी शैक्षणिक संस्थांपासून विद्यापीठांपासून दूर राहतात. ज्यांना नियमितपणे महाविद्यालयात येणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील ऑनलाइन विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत विचार केला गेला आहे. याबाबत आज त्यासंबंधीचा निर्णय सुद्धा केला असून समितीचे गठन केले आहे. या समितीमध्ये पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. के. शेगावकर हे अध्यक्ष असणार आहेत
ज्या विद्यार्थ्यांना नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालयात येण्याची गरज नसेल. विद्यापीठ शुल्का व्यतिरिक्त निवासी खर्च , प्रवास खर्च इत्यादी खर्च विद्यार्थ्यांचा कमी होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा हे शिक्षण परवडणारे असणार आहे. शिवाय, कोव्हीड 19 सारख्या आपत्कालीन काळात सुद्धा ऑनलाइन शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडणार नाही, किंवा शिक्षण थांबणार नसून या ऑनलाईन विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये ऑनलाइन /डिजिटल शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. विद्यार्थ्यांना माफक खर्चामध्ये ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन विद्यापीठाच्या स्थापनेचा अनुषंगाने परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठीच ही समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे. ही समिती इतर राज्यात देशांमध्ये विद्यापीठ स्थापन करत असताना ते कशा प्रकारे केली आहे? तिथे कशाप्रकारे अभ्यासक्रम शिकवला जातो? याबाबत माहिती घेऊन महाराष्ट्रात ऑनलाइन विद्यापीठाच्या स्थापनेबाबत आराखडा तयार करणार आहे. ऑनलाइन विद्यापीठे स्थापन करत असताना त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, साधने,त्यासाठी लागणारा खर्च याचा सुद्धा तपशील समिती सादर करेल. शिवाय, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाचा अभ्यासक्रम विचारात घेऊन ऑनलाइन विद्यापीठासाठी नेमका कशा प्रकारे अभ्यासक्रम असावा यासाठी सुद्धा समिती विचार करून अभ्यासक्रमाबाबत आराखडा तयार करेल.
या समितीमध्ये पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आर. के. शेगावकर अध्यक्ष म्हणून असतील. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे सदस्य रमण प्रीत, पुण्याच्या नेव्हील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचे डॉ आनंदराव दादस, नागपूरच्या आयआयएम चे संचालक भीमराव मेत्री हे सदस्य म्हणून असतील.
संबंधित बातम्या :
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत कौशल्य आधारित शिक्षण मिळणार, राज्य सरकारचा इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार
- शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल आणि बीएससी यांच्यात सामंजस्य करार
- मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमणाचा विळखा! विद्यापीठाची अडीच एक्कर जागा एसआरए प्रकल्पासाठी?