(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना लाच दिली; राणा दाम्पत्याचा आरोप
Maharashtra News : मुंबई महापालिकेनं खारच्या घरासंदर्भात पाठवलेल्या नोटीशीबाबत बोलताना रवी राणा यांनी टीकास्त्र डागलं आहे. मुंबई महापालिका म्हणजे, भ्रष्टाचाराची लंका असल्याचा घणाघाती आरोप रवी राणा यांनी केला आहे.
Maharashtra News : राजद्रोहाचं कलम स्थगित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात राणा दाम्पत्यानं दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली. त्यामुळे सगळी संकटं दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा वाचली, तर आमच्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असं ते म्हणाले. राजद्रोहाचं कलम हे इंग्रजांच्या काळातील. हे सरकार इंग्रजांच्या काळातील कलमांचं पालन करतंय, हे दुर्देव, असल्याची खंत रवी राणा यांनी व्यक्त केली आहे.
आमदार रवी राणा म्हणाले की, "ज्या पद्धतीनं हनुमान चालिसाचं वाचन केल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. इंग्रजांच्या काळात जे कलम लोकमान्य टिळक, गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यावेळी त्यांच्यावर देशद्रोहाचा कलम लावला होता. त्याच कठोर कायद्यांतंर्गत हनुमान चालिसा वाचल्यामुळं आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
"राज्यात सध्या महागाई, बेरोजगारी यांसारखी अनेक संकट आहेत. उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून महाराष्ट्राची पूर्ण दुर्दशा झाली आहे, त्यामुळे हनुमान चालिसाचं वाचन करुन या सर्व संकटातून मुक्तता मिळवण्याचाच आमचा हेतू होता. त्यामुळे आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करुन आम्हाला 14 दिवस तुरुंगात ठेवलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो की, त्यांनी राजद्रोहाच्या कायद्याला स्थगिती दिली आहे.", असंही ते म्हणाले. अशातच पुढे बोलताना ते म्हणाले की, इंग्रजांनी केलेले कायदे मोडून काढण्याचं काम जर कोणी करत असेल, तर ते मोदी सरकार आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र इंग्रजांनी केलेल्या कायद्याचं पालन करत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना लाच दिली : रवी राणा
"मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर राजद्रोहाचं कलम लावलं. मुख्यमंत्र्यांनी संजय पांडेंना लाच दिली, तसेच, आश्वासनही दिलं. म्हणूनच पांडेंनी आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन आम्हाला तुरुंगात टाकलं.", असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच, आम्ही आमचं म्हणणं 23 तारखेला संसंदेत मांडणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई महापालिका म्हणजे, भ्रष्टाचाराची लंका : रवी राणा
मुंबई महापालिकेनं खारच्या घरासंदर्भात पाठवलेल्या नोटीशीबाबत बोलताना रवी राणा यांनी टीकास्त्र डागलं आहे. मुंबई महापालिका म्हणजे, भ्रष्टाचाराची लंका असल्याचा घणाघाती आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच, मुंबईतील घराला मिळालेल्या नोटिशाला कायद्यानं उत्तर देऊ, असंही माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्यानंतर राणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचं कलमही लावण्यात आलं होतं. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचं कलम लावणं अयोग्य असल्याचं सत्र न्यायालयानंही म्हटलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयानंच राजद्रोहाचं कलम स्थगित केल्यानं राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.