Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच भाजप पक्षश्रेष्ठी सोडवणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाणार
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत जाणार आहेत.
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज दिल्लीत जाणार आहेत. दोन्ही नेते एकत्रित जाणार नाहीत. मात्र दिल्लीत गेल्यावर तिथे दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीगाठींमधूनही खातेवाटपावर सहमती होऊ शकलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीने शिवसेना-भाजप खातेवाटपाची समीकरणं बिघडली. जी खाती शिवसेना-भाजपकडे जाणार होती, त्यापैकी 9 मंत्री आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा कोटा कमी झाला आहे. एकूण 42 पैकी उरलेल्या 14 मंत्रिपदांमध्ये तीनही पक्षांना कसं सामावून घ्यायचं असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे सर्व 9 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राज्यमंत्रिपदाची अपेक्षा राष्ट्रवादीला असू शकते. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेचे आमदार आपलं मंत्रिपदाचा आकडा कमी झाल्यामुळे नाराज होते. त्यामुळे या दोघांची समजूत काढण्याची शक्यता आहे. हे दोघे एकत्र जात नसले तरी एकाच विषयासाठी जात आहेत. त्यामुळे अमित शाह नेमका कोणता फॉर्म्युला देणार हे पाहावं लागेल.
राष्ट्रवादीच्या समावेशामुळे शिवसेना-भाजपमध्ये अस्वस्थता
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं परंतु अद्याप शिवसेना आणि भाजपचे आमदार मंत्रिमंडळात सामील होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शिंदे यांच्यासमवेत आमदारांची मागील आठवड्यात बैठक झाली. त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेली खाती राष्ट्रवादीसाठी सोडू नये, अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यावर भाजपने मान्य केलेली आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी कोणतंही खाते राष्ट्रवादीला दिलं जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या खात्यांसाठी आग्रही
राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यासह ऊर्जा, जलसंपदा, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्यांची मागणी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा