Donald Trump : इस्त्रायल-हमास संघर्ष संपणार? पश्चिम आशियात काहीतरी मोठं होणार, ट्रम्प यांच्या पोस्टनंतर चर्चा
Donald Trump Announcement Middle East : इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील वादावर भाष्य केलं आहे.

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आता पश्चिम आशियात काहीतरी मोठं होणार असल्याचं संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल (Truth Social) वर याची माहिती दिली. मध्य-पूर्व म्हणजे पश्चिम आशियात काहीतरी महान कार्य करण्याची संधी आपल्याकडे आहे, पहिल्यांदाच असं काही घडणार आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यामुळे ट्रम्प आता इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेला संघर्ष (Israel Hamas Conflict) थांबवणार का? की आणखी काही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) हे व्हाईट हाऊस (White House) भेटीसाठी आले आहेत. त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांची ही पोस्ट इजरायल–हमास संघर्षाशी (Israel–Hamas Conflict) संबंधित एखाद्या शांती प्रक्रियेचा असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Donald Trump Social Media Post : नेमकं काय म्हटलेत ट्रम्प?
ट्रम्प म्हणाले की, "पश्चिम आशियात काहीतरी महान कार्य करण्याची संधी आहे. पहिल्यांदाच काहीतरी विशेष गोष्टीसाठी सर्वकाही जुळून आलं आहे. आम्ही ते पूर्ण करू."
Netanyahu US Visit : नेतन्याहूची व्हाईट हाऊस भेट
अमेरिकन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी व्हाईट हाऊस मध्ये ट्रम्प आणि नेतन्याहू यांची भेट होणार आहे. या बैठकीत संघर्ष विराम किंवा शांतीसाठी एखाद्या कराराची रूपरेषा तयार होऊ शकते.
Israel Hamas Conflict : हमास–इस्त्रायल संघर्षाची पार्श्वभूमी
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने (Hamas) इस्त्रायलवर मोठा हल्ला केला. त्यात 1,219 लोकांचा मृत्यू झाला आणि 251 लोकांना बंदी बनवले गेले. यातील 47 जण अजूनही गाझा (Gaza) मध्ये आहेत, तर 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलच्या प्रत्युतर कारवाईत गाझातील 65,549 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.
शांतीची शक्यता किंवा तणाव वाढू शकतो
ब्रिटन, फ्रान्स आणि इतर पश्चिमी देशांनी पॅलेस्टाईनला (Palestine) स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की, इस्त्रायल आणि हमासमधील लांब काळापासून सुरू असलेला संघर्ष संपणार की परिस्थिती अधिकच क्लिष्ट होईल.
ही बातमी वाचा:























