संविधानाची विटंबना ते तोडफोड, जाळपोळ, फडणवीसांनी विधिमंडळात A टू Z सांगितलं, परभणीत नेमकं काय-काय घडलं?
परभणीतील हिंसाचारावर देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उत्तर दिलं आहे. त्यांनी परभणीच्या हिंसाचारात नेमकं काय घडलं, याची सविस्तर माहिती दिली आहे.
नागपूर : परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उत्तर दिलं आहे. संविधानाच्या प्रतिकृतीसोबत नेमकं काय घडलं होतं? सोबतच परभणीत हिंसाचार नेमका कसा झाला? याची सविस्तर माहिती फडणवीस यांनी दिली आहे. ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली, तो मनोरुग्ण आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
साधारणपणे दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी चार ते पावणे पाच वाजेदरम्यान, दत्तराव सोपानराव पवार (वय 47) या व्यक्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळच्या प्रतिकात्मक संविधानाची काच फोडली. संविधान खाली फेकले. त्यानंतर अनेक घटना घडल्या. आपण बघितलं तर ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना जशी माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी वाढू लागला. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं. तेथील काही आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या. समाजातले काही लोक काही नेतेमंडळी होती जी शांततेने हे सगळं झालं पाहिजे असा प्रयत्न करत होते, असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
या कॉलनंतर जिल्हाधिकारी आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी चर्चा केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्याठिकाणी हार घातला आणि त्यानंतर सगळ्यांचे चर्चा करून सगळे गेले. मात्र 60-70 लोक रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस होती. या रेल्वेसमोर त्यांनी आंदोलन केले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
शांततेत चक्काजाम आंदोलन पार पडले
दरम्यानच्या काळामध्ये काही संघटनांनी त्या दिवशीचा परभणी शहर आणि जिल्हा बंद अशा प्रकारचा बंद पुकारला. हा बंद पुकारल्यानंतर तो शांततेत व्हावा म्हणून या सगळ्या संघटनांना पोलिसांनी शांतता मिटींगला पाचारण केलं. जवळपास 70 ते 80 विविध संघटनांचे कार्यकर्ते या शांतता मिटींगला हजर होते. हा बंद कसा व्हावा यासाठी जागा ठरल्या, कुठे रास्ता रोको होईल, कुठे निवेदन दिले जाईल, हे सगळं ठरलं. त्या हिशोबाने पोलिसांनीदेखील 19 फिक्स पॉईंट तयार केले आणि त्यानंतर 11 डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सात ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन सुरू झाले. सगळं शांततेत सुरू होतं आणि त्यातल्या सात वेगवेगळ्या डेलिगेशन्सने एक एक करून जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शांतपणे आपली निवेदन दिली, असे फडणवीस यांनीस सभागृहात सांगितले.
काही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू केली
हे आंदोलन चालू असतानाच वसंतराव नाईक पुतळ्याजवळ, गंगाखेड रोड या भागात काही आंदोलकांनी पहिल्यांदा टायर जाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर 300 तो 400 आंदोलक जमा झाले. यातील काही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू केली. ही घटना इतकी सिरीयस होते की त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी बंद पाळला. दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. आंदोलकांनी दुकानांची तोडफोड केली. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणच्या गाड्या जाळण्याचं काम झालं, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली, काचा फोडल्या
तोडफोड सुरू असताना पोलिसांनी तत्काळ जमावबंदी घोषित केली. आंदोलनातील काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. काचा फोडल्या, त्या ठिकाणचे खुर्च्या फेकल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या फायली फेकल्या, परंतु जिल्हाधिकाऱ्यांना देखील अतिशय संयमाने कोणाशी दुर्व्यवहार न करता त्या ठिकाणी सगळी परिस्थिती हाताळली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis Video News :
कोम्बिंग ऑपरेशन करू नका असं सांगितलं
संविधानाच्या मोडतोडीमागे मनोरुग्ण आहे. अनेकांनी प्रशासनाला सहकार्य करुन आंदोलन केलं. मात्र काही तरी उद्वेगाने तोडफोड करण्यात आली. शांताता मार्गाने आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र जी तोडफोड झाली, त्याचे समर्थन करायचे का? 1 कोटी 89 लाख रुपयांचं नुकसान यात झालं आहे. परभणीतील तोडफोडीदरम्यान, मला 4 वाजता प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला की कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे. त्यानंतर मी तत्काळ पोलीस अधिकारी यांच्यासोबत बोललो. त्यांना सांगितलं की कोम्बींग आॅपरेशन करू नका, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.