Nagpur News : जिल्हा सत्र न्यायालयात वकील आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची धक्काबुक्की : परस्परांविरोधात तक्रार दाखल
वकिल असलेल्या रजा यांनी रॉंग साईडने येत असतानाही 'यु-टर्न' न घेता गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येडकेंनी त्यांना पकडले व यावेळी झालेल्या झटापटीत रजा गाडीवरून पडले. त्यानंतर वाद सुरु झाला.
Nagpur News : नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी एकच्या सुमारास एक वकील आणि पोलिसांत (Nagpur Traffic Police) धक्काबुक्की झाली. प्राप्त माहितीनुसार वकील असलेले ॲड. तहसीन रजा 'रॉंग साई़ड'ने गाडीने जात होते. त्यांना तैनात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने हटकले आणि थांबविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिस कर्मचाऱ्याने वकिलाच्या दुचाकीचा ब्रेक दाबल्याने ॲड. तहसीन रजा खाली पडले. त्यानंतर जिल्हा न्यायालयासमोर वाद झाला.
प्रत्यक्ष दर्शीं वकिलांनी सांगितल्यानुसार, ॲड. तहसीन रजा हे रॉंग साईडने येत होते. तेव्हा ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस निरीक्षक बबन येडके यांनी रजा यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच रजा यांच्या दुचाकीचा ब्रेक दाबला. त्यात ते खाली पडले आणि त्यांच्या पायालाही दुखापत झाली. त्यानंतर परिसरात उपस्थित वकिलांनी त्यांना उचलले आणि वाहतूक पोलिसांविरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येत वकील परिसरात जमा झाले. अनेकांनी घटनेचे फोटो आणि व्हिडीओही काढले. तसेच वकिलांकडून पोलिसाने कॅलर पकडण्याचा आरोप लावण्यात आला. तसेच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपही वकिलांकडून करण्यात आला.
बबन येडके सदर वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, रजा त्यांच्या दुचाकीवरून रॉंग साईडने जात होते. यावेळी या परिसरात हजर असलेल्या येडकेंनी त्यांना 'यु-टर्न' घेण्यास सांगितले. मात्र, रजा यांनी 'यु-टर्न' न घेता गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येडकेंनी त्यांना पकडले व यावेळी झालेल्या झटापटीत रजा गाडीवरून पडले. यावेळी येडकेंनी रजा आणि इतर वकिलांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. पाहता पाहता वकिलांची गर्दी जमली व पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी सुरू झाली. येडकेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त दर्ज्याच्या अधिकाऱ्याकडून चौकशी
तशी तक्रारही रजा यांनी सदर पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच येडगे यांनी रजांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली तक्रार केली आहे. अद्याप या प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. प्रकरण चांगलेच तापत असल्याचे लक्षात आल्याने पोलिस उपायुक्त एम.सुदर्शन आणि सदर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी घटनास्थळी पोहोचले. वकिलांकडून जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष रोशन बागडे, माजी अध्यक्ष कमल सतुजा आणि ॲड.श्रीरंग भंडारकर सुद्धा पोहोचले. वकिलांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी येडगेंना बाहेर काढले. वकिलांनीसुद्धा सदर पोलिस ठाण्यापर्यंत पदयात्रा करीत तेथे जात तक्रार दाखल केली.
ही बातमी देखील वाचा...