मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये विजेचा लखलखाट, मात्र कोळशाच्या खाणी असलेल्या चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्याला नरकयातना
Chandrapur: विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाच्या सर्वाधिक खाणी आहेत, मात्र या खाणींमुळे स्थानिक गावकऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय.
चंद्रपूर: मुंबई-पुण्यासारखी शहरं विजेच्या लखलखाटाने 24 तास चमकतात, मात्र या लखलखाटाची किंमत चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्यातील लोकं कशा प्रकारे चुकवतात याचं एक ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.
औष्णिक ऊर्जा राज्याच्या विकासासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. मात्र ही वीज ज्या कोळशापासून तयार होते त्या कोळशाच्या सर्वाधिक खाणी या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या कोळसा खाणीमुळे स्थानिक लोकं अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. कोळशाच्या वाढत्या मागणीमुळे अलीकडेच वरोरा तालुक्यातील एकोना कोल माईनचा विस्तार करण्यात आला. 3.44 मिलियन टन प्रति वर्ष इतकी प्रचंड या कोळशा खाणीची उत्पादन क्षमता आहे. मात्र या कोळसा खाणींमुळे स्थानिक गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तर खाणीतून निघणाऱ्या मातीमुळे नदी-नाल्यांचा मार्ग अवरुद्ध झाला आहे आणि शेतीचं मोठं नुकसान होत आहे. मुख्य म्हणजे या खाणीमुळे स्थानिकांना रोजगार देखील मिळालेला नाही. या विरोधात एकोना खाणीच्या परिसरातल्या 27 गावातील लोकं एकत्र आले असून एक कृती समितीच्या माध्यमातून याविरोधात लढा उभारण्यात आलाय. कोळशाची वाहतूक करणारे ट्रक या रस्त्यांची चाळण होण्यामागचं कारण ठरलं आहे. धूळ उडवत वेगाने धावणाऱ्या ट्रकमुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे.
एकोना खाणीच्या विरोधात हे सर्व गावकरी 24 तारखेला खाण बंद पाडण्यासाठी आंदोलन करणार आहेत. या स्थानिक लोकांचं आंदोलन दाबण्यासाठी राजकीय नेत्यांचा मोठा दबाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन भविष्यातल्या संघर्षाची मोठी नांदी ठरणार आहे.
गडचिरोलीत खनिजांच्या ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण
कोट्यवधींची खनिज संपत्ती असलेल्या गडचिरोलीत रस्त्यांची मात्र दूरवस्था झाली आहे. खनिजाची वाहतूक करणारे ट्रक या रस्त्यांची चाळण होण्यामागचं कारण ठरलं आहे. धूळ उडवत वेगाने धावणाऱ्या ट्रकमुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे. गडचिरोलीतील अहेरी आणि एटापल्ली या अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय आरोग्याच्या सोयी नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना सडक मार्गाने चंद्रपूर गडचिरोली किंवा नागपूरला नेण्याशिवाय पर्याय नाही. अनेकांसाठी हा मार्ग मृत्यूचा मार्ग ठरला आहे. कारण खराब रस्त्यांमुळे वेळेत रुग्णालयात न पोहचू शकल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरजागड खाणीतून रोज हजारोंच्या संख्येने निघणाऱ्या ट्रक्समुळे शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांसोबतच शेतीचंही नुकसान होतं आहे. कष्टाने पिकवलेलं पांढरं सोनं धुळीमुळे काळ पडू लागलंय.