तीन महिन्यात एकही सुट्टी नाही, टेलिफोन ऑपरेटरचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मागील तीन महिन्यांपासून दोन्ही डोळ्यांनी अंध असून देखील राजू चव्हाण दररोज कामावर येतं आहेत. विशेष बाब म्हणजे या कालावधीत राजू चव्हाण यांनी एक दिवस देखील सुट्टी घेतलेली नाही.
मुंबई : मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात काम करणारे टेलिफोन ऑपरेटर राजू चव्हाण यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून कौतुक केलं आहे. मागील तीन महिन्यांपासून दोन्ही डोळ्यांनी अंध असून देखील राजू चव्हाण दररोज कामावर येतं आहेत. विशेष बाब म्हणजे या कालावधीत राजू चव्हाण यांनी एक दिवस देखील सुट्टी घेतलेली नाही. राजू चव्हाण दररोज जवळपास अडीच तासांचा प्रवास करून चार गाड्या बदलून रुग्णालयात काम करण्यासाठी येतं असतात. लॉकडाऊन काळात देखील जोगेश्वरी येथुन दररोज चव्हाण हे अत्यावश्यक सेवेतील गाडीने प्रवास करून रुग्णालयात येतं होते.
याबाबत बोलताना राजू चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आल्यामुळे अतिशय आनंद झाला. सध्या कोरोनाव्हायरस विरोधात आपलं युद्ध सुरू आहे. आणि अशा वेळी घरी राहणं मला आवडणारं नव्हतं. ही सुट्टी घेण्याची वेळ नाही. त्यामुळे मी कामावर न चुकता हजर होतो. या काळात टेलिफोन ऑपरेटर म्हणून रुग्णांच्या शेकडो नातेवाईकांचे फोन घेऊन त्यांना दिलासा देणे. तसेच रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, अशी कामे दररोज करावी लागतात. काही दिवसांपूर्वी मला लंडनहून फोन आला होता. फोनवर बोलणारी मुलगी रडत होती. रडण्याचं कारण विचारलं असता तिने माहिती दिली की तिचे वडील कफ परेड परिसरात चालताना पडले आहेत. त्यांना तत्काळ उपचारांची गरज आहे. त्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालयाची अम्ब्यूलन्स तत्काळ घटनास्थळी पोहचली आणि त्या रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती बरी आहे. अशा प्रकारचे अडचणींचे शेकडो फोन येतं असतात. माझ्या या सेवेपेक्षा सध्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय खूप महत्त्वाचं काम करत आहेत. ते खरे कोरोना योद्धे आहेत. माझा या अतिशय कठीण काळात अगदी छोटासा खारीचा वाटा आहे.
राजू चव्हाण यांच्याबाबत बोलताना त्यांचे सहकारी डॉ. गोकुळ म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असताना देखील राजू चव्हाण यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. राजू चव्हाण तब्बल चार गाड्या बदलून रुग्णालयात येतं होते. या सर्व प्रवासात त्यांना डॉक्टर, पोलीस यांची खुप मदत झाली. राजू चव्हाण यांचा हाच प्रामाणिकपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवडला आणि त्यांनी राजू चव्हाण यांना सोमवारी दुपारच्या सुमारास फोन केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचं संपुर्ण रुग्णालय प्रशासनाकडून कौतुक करण्यात येतं आहे. राजू चव्हाण यांच्या या प्रामाणिकपणाचा आदर्श सध्या लॉकडाऊनच्या काळात घरी राहिलेल्या सर्वांनी घ्यावा.