Chandrapur : शिकारीच्या संशयातून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली ग्रामस्थांना अमानुष मारहाण, विजेचे शॉक दिल्याचा आरोप
शिकार केल्याचा पुरावा नसताना ग्रामस्थांना मारहाण आणि विजेच्या शॉक दिल्याप्रकरणी दोन वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर : चिंचोली येथील सात ग्रामस्थांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मारहाणीसोबतच विजेचे शॉक दिल्याचा आरोप पीडित ग्रामस्थांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केल्यानंतर दोन वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिकारीच्या संशयावरून सात ग्रामस्थांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी 24 आणि 25 नोव्हेंबरला अमानुष मारहाण केली. ताडोबा-अंधारी वाघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत असलेल्या या गावात एका चितळाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. चौकशीसाठी वनविभागाने या गावातील सात जणांना ताब्यात घेतले आणि बेदम मारहाण केली. चार्जिंग बॅटरीद्वारे हातापायाला शॉक दिला तर आकाश चांदेकर या ग्रामस्थाच्या गुप्तांगावर चार्जिंग मशीन ठेवली असाही आरोप केला गेलाय.
या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले आणि त्यांना निवेदन दिले. त्या नंतर दोन वन कर्मचाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कुठलाच पुरावा नसतांना आदिवासी आणि दलित समाजातील या ग्रामस्थांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्याप्रकारे अमानुष मारहाण केली त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत शिकारीच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे वनविभाग मोठ्या दडपणाखाली आहे. मात्र पुरावा नसतांना ग्रामस्थांना अशा प्रकारे मारहाण झाली तर परिस्थिती सुधारण्या ऐवजी आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tadoba Andhari Tiger Reserve: माया वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू
- सोलापूरकरांच्या विमानसेवेत अडथळा! प्रस्तावित विमानतळासाठीचा निर्वनीकरणाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळला
- पुण्यात सलीम अली पक्षी अभयारण्य धोक्यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha