सोलापूरकरांच्या विमानसेवेत अडथळा! प्रस्तावित विमानतळासाठीचा निर्वनीकरणाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळला
सोलापूरकरांच्या विमानसेवेचे (solapur airport) स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठीच्या जमीनाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळून लावला आहे.
सोलापूर : सोलापूरकरांच्या विमानसेवेचे (solapur airport) स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण सोलापुरातील प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठीच्या जमीनाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळून लावला आहे. दक्षिण सोलापुरातील बोरामणी गावात नवीन विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत 573 हेक्टर जमीनीचे भूपसंपादन झाले आहे. याच विमानतळासाठी आवश्यक असलेली 33.72 हेक्टर जमीन ही वनविभागाच्या अखत्यारित आहेत. याच जमिनीचा निर्वनीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने वनविभागाकडे देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव वनखात्याच्या प्रादेशिक अधिकार समिती (आरईसी- रिजनल ईम्पॉवर्ड कमिटी) ने फेटाळून लावला आहे.
जगात अंत्यत दुर्मिळ असलेल्या माळढोक पक्षाचे वास्तव्य सोलापूर जिल्ह्यात आढळते. माळढोकच्या संवर्धनासाठी अभ्यारण्य देखील सोलापुरात आहे. याच अभ्यारण्याची ही 33.72 हेक्टर जागा आहे. त्यामुळे सोलापूर परिसरात आधीपासून विमानतळ असताना माळढोकांपेक्षा नवे विमानतळ महत्वाचे नाही. अतिशय दुर्मिळ असलेल्या माळढोकचे संवर्धन होणे महत्वाचे असल्याचे मत देखील वनविभागाच्या समितीने व्यक्त केले आहे.
देशात अगदी बोटावर मोजण्या इतकेच माळढोक पक्षी आता राहिले आहेत. सोलापुरात देखील मागील वर्षभऱात फक्त एका मादी माळढोकचा रहिवास आढळून आला आहे. मात्र या मादी माळढोकमुळे भविष्यात आणखी संख्या वाढू शकते. मात्र बोरामणी येथील प्रस्तावित विमानतळासाठी जागा दिल्यास माळढोकचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतो. 2021-22 च्या अर्थसंकल्पात बोरामणी येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीची तरतूद आहे. त्याचा पहिला टप्पा देखील प्राप्त झाला आहे. मात्र वनविभागाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे भूसंपादना प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे सोलापुरकरांच्या विमानसेवेचे स्वप्न आता शासन कशापद्धतीने पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
आधीपासून अस्तित्वात असलेल्या होटगी रोड विमानतळात 'चिमणी'चा अडथळा
सोलापुरात आधीपासून एक विमानतळ अस्तित्वात आहे. सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरात अत्यंत सुसज्ज असे विमानतळ आहे. काही वर्षांपूर्वी या विमानतळावरुन सोलापूर-मुंबई असा विमानप्रवास देखील सुरु होता. मात्र किंगफिशर कंपनी डबगाईला आल्याने ही विमानसेवा बंद पडली. मात्र पुन्हा विमानसेवा सुरु करत असताना जवळ असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोजनरेशनची चिमणी अडथळा ठरत असल्याचा निर्वाळा नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने दिला. न्यायालयाने या चिमणीची उंची कमी करुन विमानसेवा सुरु करण्याचे आदेश ही दिले. मात्र या ना त्या कारणामुळे अद्यापदेखील चिमणी तशीच उभी आहे. त्यामुळे सोलापुरातील होटगी रोड विमानतळाची सेवा बंदच आहे.
सोलापुरातून जाणारी बुलेट ट्रेन मराठवाड्यातून नेण्यास विरोध
मुंबई-पुणे-सोलापूर- हैदराबाद हा नियोजित मार्ग बदलून मुंबई-जालना-नांदेड-हैदराबाद या मार्गाने मराठवाड्यातून बुलेट ट्रेन न्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मात्र नियोजित मार्ग बदलून बुलेट ट्रेन मराठवाड्यातून नेण्यास सोलापुरकरांचा विरोध होतोय. खासदार रणजित नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य़ यांनी मुख्यमंत्र्याच्या या मागणीचा विरोध केलाय. नियोजित मुंबई-हैदराबाद या बुलेट ट्रेन मार्गाचा आणि सामाजिक सर्व्हे पुर्ण झाला आहे. सोलापुरच्या विकासासाठी ही ट्रेन अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे नियोजित मार्ग बदलण्यात येऊ नये अशी आपली भूमिका असून गरज पडल्यास पंतप्रधानांची भेट घेऊ असे मत भाजपच्या खासदारांनी व्यक्त केले.