BLOG : आयुष्य उमगायला मदत करणारा 'माझा महाकट्टा'

BLOG : एबीपी माझाचा 'माझा कट्टा' हा खरं तर तुमच्या आमच्या मनात घर करून राहिलेला संवादाचा कार्यक्रम. विविध क्षेत्रातील दिग्गजांपासून ते तरुणाईपर्यंत अनेक मंडळींनी या मंचावर आपला प्रवास मांडलाय. याच कट्ट्र्याचा आणखी एक महाकट्टा शुक्रवारी पार पडला. यामध्ये अनुप जलोटा, जया किशोरी तसंच अमृता सुभाष-संदेश कुलकर्णी यांच्या गप्पांमधून गवसलेले हे काही विचार बरंच काही देऊन आणि शिकवून जाणारे होते.
प्रवचनकार जया किशोरी...ज्यांचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. भारतभरात आहे. त्या कट्ट्यावर आल्या होत्या. राजीव सरांनी त्यांना रॅपिड फायरमध्ये प्रश्न विचारला...लक्ष्मीपूजन की सरस्वतीपूजन तुम्हाला काय करावंसं वाटतं? त्या म्हणाल्या, आपसे धन तो कोई भी छीन सकता है....कला नही छीन सकता....सरस्वती की पूजा करे...लक्ष्मी अपनेआप आ जाएगी...
आणखी एक थॉट जो त्यांनी मांडला... बहता पानी निर्मला...अर्थात पाणी वाहत असताना ते स्वच्छ असतं, थांबलं की घाण येते त्यात... प्रवाही राहणं किती गरजेचं आहे हेच त्यांनी अधोरेखित केलं. त्याच वेळी एकाच जागी न राहता सतत काहीतरी करत राहणं, पुढे जात राहणं हाही आपला स्थायीभाव असायला हवा, हेही यातून अंडरलाईन होतंय.
याच महाकट्ट्यावर अमृता सुभाष-संदेश कुलकर्णी दाम्पत्यानेही दिलखुलास संवाद केला. ज्यात अमृताने सांगितलेलं एक वाक्य मनात खूपच खोलवर रुतणारं होतं. ती म्हणाली, सकारात्मक असण्यासोबत स्वीकारात्मक असणंही गरजेचं आहे. गोष्टी स्वीकारणं, त्या स्वीकारून पुढे जाणं हे समजायला हवं. आपण नेहमी सकारात्मक राहू शकत नाही.
खरंच किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आपण स्वीकारात्मक राहिलो तर, गोष्टी सोप्या होतात. हे आपल्याला येणाऱ्या कौटुंबिक तसंच कारकीर्दीतील अनुभवांबाबतीतही करणं गरजेचं आहे. तुमचं जगणंही याने सुसह्य होतं.
तिने मांडलेला आणखी एक विचारही फार मोलाचा. ती म्हणाली, आपल्या दु:खाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणं हा बेजबाबदारपणा आहे. तर, मला आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी आहे, दुसऱ्याची नाही.
आपल्याही आयुष्यात अनेक बरेवाईट क्षण येतात. खास करून वाईट क्षण किंवा काही व्यक्तींचे वाईट अनुभव येतात, तेव्हा आपण व्यथित होऊन नाउमेद होण्यापेक्षा त्यातून मार्ग काढण्याचीही जबाबदारी आपलीच समजून वागणं ही काळाची खरी गरज आहे.
याच महाकट्ट्याच्या मंचावर ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांनी 'राग' या विषयावर सोप्या शब्दात विवेचन केलं. हा विषय मांडताना त्यांनी एक उदाहरण दिलं, एखाद्याने चहा आणताना जर तो सांडवला, तर तो का सांडवला म्हणत आपण त्याच्यावर रागवतो. चूक त्याची होती, मग आपण का रागवायचं, आपण का त्रागा करायचा, आपल्याला त्रास का करून घ्यायचा. शरीर नावाच्या यंत्रणेला आपण का धक्का पोहोचवायचा. आपल्याला येणारा राग, स्ट्रेस आपली ऊर्जा कमी करत असतो.
रागाने आपल्या शरीरात ज्या नकारात्मक लहरी तयार होतात, त्या वाईब्ज आपली शरीर नावाची सिस्टीम तर कोलॅप्स करतेच शिवाय समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक इम्प्रेशन सोडून जाते.
जया किशोरी, अमृता-संदेश किंवा मग अनुप जलोटा असोत, या सर्वांनीच तुमच्या आमच्या नियमित आयुष्यामधले धागेच आपल्याला उलगडून दाखवलेत. जे कदाचित आपणच गुंतागुंतीचे केलेले असतात. आयुष्याकडे, जगण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती मॅटर करतो हे या मंडळींनी समजावलं. आजच्या धावपळीच्या जगात, जीवघेण्या स्पर्धेत, परफॉर्मन्स प्रेशरच्या युगात मानसिकदृष्ट्या तुम्ही सॉर्टेड असणं फार गरजेचं आहे. एआयसारखं आधुनिक तंत्राचं मोठं आव्हान समोर आ वासून उभं असतानाच आपल्यासमोरच्या आव्हानांची मालिका येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे, तशीच मानसिक कणखरतेची, मानसिक सुस्पष्टतेचीही निकडही वाढणार आहे, त्याच वेळी असे कार्यक्रम तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध करतानाच या वाटेवर चालायला बळ देतील हे निश्चित. आयुष्य समजण्याबरोबरच उमगणंही आवश्यक आहे नाही का?
























