Chandrakant Patil : लाल किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची स्वप्ने बघू नका, चंद्रकांत पाटलांचा टोला
भाजपची ही विजयी घोडदौड 2024 मध्येही सुरुच राहणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपला टक्कर देणं विरोधकांसाठी फार अवघड झालं असल्याचे पाटील म्हणाले.
Chandrakant Patil : भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश मिळणं अपेक्षितच होतं. 50 वर्ष राजकारणात घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, हेच या निवडणुकीत पाहायला मिळालं असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपची ही विजयी घोडदौड 2024 मध्येही सुरुच राहणार असल्याचे पाटील म्हणाले. भाजपला टक्कर देणं विरोधकांसाठी फार अवघड झालं आहे. भाजपाने ज्या 4 राज्यांमध्ये विजय मिळवला आहे, त्या राज्यांच्या घराघरातील स्त्रियांनीही भाजपालाच मतदान केल्याचे पाटील म्हणाले.
विरोधकांना वाटत होते की भाजपचा धुव्वा उडेल, पण त्यांचाच धुव्वा उडाला असल्याचे पाटील म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळून गोव्यात जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा जास्त मते नोटाला मिळाली आहेत. 50 50 वर्ष राजकारणात घालवल्यानंतरही काय यांचा अनुभव असतो असे पाटील म्हणाले. 2024 ला सुद्धा लाल किल्ल्यावर भाजपचाच भगवा फडकणार आहे. यावेळी तुम्हाला आमच्यासोबत यायचे असले तर येऊ शकता, पण तुम्ही शिवसेनेचा भगवा लाल किल्ल्यावर फडकवण्याची स्वप्ने बघू नका असा टोला यावेळी पाटील यांनी लगावला. उत्तर प्रदेशमध्ये आणि गोव्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सभेला गेला त्या ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले असल्याचे पाटील म्हणाले.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला यश मिळाले आहे, त्यामुळे ते ईव्हीएमचा घोटाळा आहे असे विरोधक म्हणणार नाहीत असे पाटील यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद वाढत आहे. जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा भाजप एकट्याच्या ताकदीवर राज्यात 160 जागा मिळवील असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या विजयानंतर जेवढा आनंद व्यक्त केला त्यापेक्षा 100 पटीने अधिकचा आनंद आम्ही व्यक्त करु असेही पाटील म्हणाले. दरम्यान, त्याआधी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये भाजप पूर्ण ताकदीने विजय संपादन करेल असे पाटील म्हणाले.
मुंबई पालिका जिंकण्याचे लक्ष
आमचे लक्ष मुंबई महापालिका जिंकण्याचे आहे. केंद्रापासून के राज्यापर्यंत सगळ्यांचेच लक्ष मुंबई महापालिका जिंकण्याचे आहे. मुंबई पालिकेत शिवसेनेचा प्राण अडकला असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही मुंबई पालिका जिंकल्याशिवाय राहणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.