मंत्र्यांना लाजवेल असा केंद्रीय पथकाचा नुकसान पाहणी दौरा, समस्या जाणून न घेतल्याने शेतकरी नाराज
पाहणी करण्यासाठी केंद्रातील दोन सदस्यीय पथक आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र या पथकाने चांदवड तालुक्यातील ठरलेल्या दोन गावांपैकी केवळ एकाच गावात पाहणी करत अर्ध्या रस्त्यातून माघारी गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : राज्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. राज्यात सरकार स्थापन न झाल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणे देखील अडचणीचे ठरु लागले आहे. त्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी जाहीर केलेली मदत देखील तुटपुंजी अशीच आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाच्या माध्यमातून सुरु झाली आहे. मात्र केंद्राच्या या पथकाचा थाट पाहता या पाहणी दौऱ्यातून काय साध्य होणार? असा सवाल शेतकरी करु लागले आहेत.
केंद्रीय पथकाने नाशिक जिल्ह्याचा दौरा एका दिवसात आटोपला. सुटा- बुटात 3 इनोव्हा कारमधून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक सुभाष चंद्रा आणि पथकाचा पाहणी दौरा नाशिक जिल्ह्यात आयोजित केला होता. यावेळी मंत्र्यांना लाजवेल असा या केंद्रीय पथकाचा ताफा पाहायला मिळाला. या ताफ्यात एकूण 11 वाहनं होती. निफाड, चांदवड आणि मालेगाव या तीन तालुक्यातील फक्त 6 गावांतील शेतकऱ्यांशी या पथकातील अधिकाऱ्यांनी केवळ पाच ते दहा मिनिटं संवाद साधला. तसेच एका गावात केवळ एकाच शेताची पाहणी या पथकाने केली. या दौऱ्यात आधिकाऱ्यांनी समस्या जाणून न घेतल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रातील दोन सदस्यीय पथक आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र या पथकाने चांदवड तालुक्यातील ठरलेल्या दोन गावांपैकी केवळ एकाच गावात पाहणी करत अर्ध्या रस्त्यातून माघारी गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चांदवड तालुक्यातील डोणगाव, निमोण या परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेकांच्या शेतीसह कांदा आणि अन्य पिकं वाहून गेली. यामुळे हाताशी आलेले पिक वाया गेले. ही परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय पथक येणार असल्याचे डोणगाव, निमोणच्या शेतकऱ्यांना सांगण्यात आले. ज्या ठिकाणी अधिकारी पाहणी करणार आहेत त्या शेतकऱ्यांची लिस्ट जाहीर करण्यात आली होती. मात्र उशिरा पोहचलेल्या पथकाने डोणगाव मधील दोन ठिकाणची पाहणी केली. यानंतर निमोण येथे जाण्यासाठी निघालेले पथक अचानक अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरत मालेगावच्या दिशेने निघून गेले. त्यामुळे सकाळपासून पथकाची वाट पाहणारे शेतकरी नाराज झाले. झालेल्या नुकसानीची पाहणी करुन काही तरी पदरात पडेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती मात्र ती फोल ठरली. एकूणच केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा हा केवळ एक फार्स तर ठरणार नाही ना अशी शंका अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात अवकाळी पाऊस पडून शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठी 5 सदस्यीय केंद्रीय पथक 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाले आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती आहे. औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये हे पथक भेट देणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात आले आहे.
हे ही वाचा- शेतकऱ्यांना आता केंद्राकडून अपेक्षा; ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या राज्यात
94 लाख हेक्टर शेतीचं नुकसान
अवकाळी पावसाचा फटका राज्यातील 34 जिल्हे आणि 352 तालुक्यांना बसलेला असून 94 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. तर याचा फटका राज्यातील 1 कोटी 3 लाख शेतकऱ्यांना बसलेला आहे. राज्य सरकारनं 7207.79 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. कालच एका शासकीय निर्णयाद्वारे 2059 कोटी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित करण्यात आलेले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी 6,800 रूपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 13,500, फळबागांसाठी प्रति हेक्टरी 18,000 रुपये हेक्टर अशी मदत देण्यात येणार आहे.
या अवकाळी पावसाचा फटका सगळ्यात जास्त औरंगाबाद विभागाला बसलेला असून त्याखालोखाल अमरावती आणि नाशिक या दोन विभागात मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन आणि त्यानंतर कापूस या पिकाला बसलेला आहे.
यवतमाळमध्ये केंद्रीय पथकाची नुकसान पाहणी
यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आज केंद्रीय पथकाची पाहणी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यवतमाळच्या नेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन शेतातील नुकसानाची पथकाने दखल घेतली. यावेळी पथकाने सोयाबीन आणि कापूस या पिकांची मुख्यता पाहणी केली. यावेळी सातेफळ गावातील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने किती मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि सर्व पिकांची झालेली अवस्था किती दयनीय झाली आहे हे केंद्रीय पथकाला कळावे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन,कापूस, उडीद, मूग ,ज्वारी ,तूर आणि इतर पिकांचे नमुने सादर केले. यावेळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कृषी अधिकारीसुध्दा या केंद्रीय पथका सोबत उपस्थित होते.
धुळे : धुळे जिल्ह्यात सूर्य मावळतीला असताना पीक नुकसानीची केंद्रीय समितीकडून पाहणी करण्यात आली. बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करून पथक पुढे जळगावकडे रवाना झाले. बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करो की उजेडात पाहणी करो, नुकसान भरपाई मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सत्तास्थापनेच्या तिढ्यात शेतकरी दुर्लक्षित राज्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. मात्र, राज्यात सरकार अस्तित्वात नसल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मदतीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागणी केली होती. यावर राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी 8 हजारांची प्रतिहेक्टरी मदत; तर बागायत शेतीसाठी, फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तत्काळ देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. मात्र, राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून हेक्टरी 25 हजार मदत जाहीर करावी, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली होती. त्यामुळं उद्या येणाऱ्या केंद्रीय पथकाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.