CCTV | शिर्डीमध्ये गावगुंडांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
बेदम मारहाण होत असताना पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालवणकर यांनी रक्तबंबाळ अवस्थेतही एका गुंडाला पकडून ठेवले. त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मालवणकर यांच्यावर शिर्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिर्डी : मजुराला अमानुष मारहाण करणाऱ्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार ते पाच गुंडांनी मारहाण केल्याची घटना राहाता बाजारतळ समोरील सराफ बाजारात घडली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने पोलिसाला सिनेस्टाईल मारहाण केली. बेदम मारहाण होत असतानाही रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील म्होरक्या विकी चावरे या गुंडाला पकडून ठेवल्याने पोलिसाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
राहाता येथे गुरुवारचा बाजार असल्याने बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात. पिंपळवाडी येथे वीटभट्टीवर काम करणारा मजुर गुरुवारच्या आठवडे बाजारला आला होता. बाजार करताना एका सोरटच्या ठिकाणी त्याला सोरट चालवणाऱ्या टोळक्याने खेळण्यासाठी बळजबरी केली. तो खेळत नाही हे पाहुन त्याच्याकडील पैसे टोळक्याने हिसकाऊन घेत त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मजुर रामनरेश केवड याच्या डोक्याला मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्याने जख्मी अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले.
त्याची अवस्था पाहून पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर हे त्याच्या सोबत संबंधित टोळक्याला पकडण्यासाठी गेले. गावगुंडाच्या टोळक्याने मागे पुढे न पाहाता पोलीस कॉन्स्टेबल मालणकर यांचेवर लाकडी दांडक्याने हल्ला केला. चार ते पाच जणांनी पोलिसास अमानुषपणे मारहाण केली. मारहाण होत असतानाही मालणकर यांनी टोळक्यातील एकाला घट्ट पकडून ठेवले. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
जखमी मजुर रामनरेश केवड आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर यांना राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मालणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहेत.