शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार, दीपक केसरकरांची माहिती
मुंबई : संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले.
मुंबई : संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळच्या शिष्टमंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मंत्री केसरकर यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
राज्यातील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने संशोधनासाठी यापुढे शासनाकडून अनुदान
मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विविध विषयांची वर्गवारी करून ते विषय विद्यापीठांना द्यावेत, या विषयांवर संशोधन करणाऱ्या संशोधक आणि त्यांच्या मार्गदर्शकांना शालेय शिक्षण विभागामार्फत अनुदान देण्यात यावे, तसेच ते संशोधन शाळा महाविद्यालयांमधून संदर्भ ग्रंथ म्हणून वापरण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागासोबत करार करण्याची सूचना त्यांनी केली. राज्य मराठी विकास संस्थेची बैठक दर तीन महिन्यांनी आयोजित करुन या बैठकीस सर्व विद्यापीठांच्या मराठी भाषा विभाग प्रमुखांना निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित राहण्यास सांगावे असेही त्यांनी सांगितले. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा समावेश करावा, तर कवितेचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा येथील कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, कार्यकारी समिती सदस्य डॉ. गणेश चंदनशिवे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, प्रशासकीय अधिकारी तथा सदस्य सचिव गिरीश पतके आदी उपस्थित होते.
मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन व्हावे हे विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने विविध विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षण विभागाच्या विविध ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी पुस्तके, ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत. ग्रंथ तयार करताना शेवटच्या पानावर वाचकांच्या सोयीसाठी ग्रंथाबाबतचे संक्षिप्त वर्णन द्यावे. तसेच विश्वकोशमध्ये ग्रंथसूची खंडाची नोंद घ्यावी. मराठी ग्रंथसूचीचे खंड सर्व ग्रंथालयात संग्रही ठेवावेत. दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरणाद्वारे जतन करून उत्कृष्ट साहित्य महाजालावर उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम राबविला जाणार आहे, यादरम्यान त्यांना उत्कृष्ट वाचन करायला लावावे तसेच मराठी गाणी ऐकवावी. मराठीबाबतच्या विविध ऐतिहासिक बाबींची विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावी.