Buldhana Urban : बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात आयकर पथक ठाण मांडून; अशोक चव्हाणांशी संबंधित कारखान्यांची चौकशी सुरु
बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात आयकर पथक ठाण मांडून असून चौकशी सुरु आहे. तसेच अशोक चव्हाणांशी संबंधित कारखान्यांना दिलेल्या कर्जाची चौकशी सुरु आहे.
Buldhana Urban Bank : आशियातील सर्वात मोठी पतसंस्था असणाऱ्या बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयात काल सलग दुसऱ्या रात्रीही झाडाझडती झाली. मंत्री अशोक चव्हाणांशी संबंधित चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी आयकर खात्याकडून बुलडाणा अर्बनची चौकशी सुरु आहे. आयकर खात्याच्या 11 जणांचं विशेष पथक परवापासून बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेतील सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत. 11 जणांच्या विशेष पथकातील 6 अधिकारी दिल्लीचे असून त्यात IRS दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन. बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत बुधवारी सकाळपासून एक 11 जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं होतं. या पतसंस्थेमार्फत झालेल्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालेलं होतं. रात्रभर हे पथक बुलढाणा अर्बनच्या मुख्य कार्यालयात विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करत होतं. तसेच आज सलग दुसऱ्या रात्रीही या पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही आत जाता येत नाही. प्रसारमध्यामांना कुठलीही माहिती या पथकाकडून किंवा बुलढाणा अर्बनकडून दिली जात नाही. बुलडाणा अर्बनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करणारं हे पथक आहे.
आयकर विभागाच्या 11 जणांच्या एका पथकाकडून बुलडाणा अर्बन पतसंस्थेतंर्गत झालेल्या व्यवहारांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. बुधवारी सकाळपासून त्यास प्रारंभ झाला आहे. पथकातील सर्व अधिकारी वर्ग हा परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. आयकर विभागाच्या एसटीएफ विभागाकडून हे सर्व्हेक्षण सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. प्रामुख्यानं उच्च-मूल्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्राप्तिकर कायद्याने आर्थिक व्यवहारांचं विवरण किंवा अहवाल करण्यायोग्य खात्यांचे प्रामुख्येने हे सर्व्हेक्षण होत असल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्याकडूनही याबाबत अधिकृत कुठली माहिती दिली गेलेली नाही.
नुकतंच या पतसंस्थेनं 10 हजार 44 कोटी ठेवी असण्याचा विक्रम केला आहे. बुलढाणा अर्बन पत संस्थेच्या 5 राज्यात 465 शाखा असून 625 वेअर हाऊस आहेत, तर 5000 कर्मचारी काम करत आहेत. या पतसंस्थेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याकाळात संस्थेची एकदाही निवडणूक झालेली नाही. संस्थेचे अनेक कोल्ड स्टोरेज असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक आणि योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. संस्थेसोबत बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टसुद्धा आहे. ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, 22 इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि 1800 कर्मचारी आहेत. शिवाय लवकरच बुलडाणा अर्बन परिवार राज्यातील 3 साखर कारखाने कार्यान्वित करणार आहे.