Buldhana Crime News : चक्क आलीशान कार मधून शेळ्यांची चोरी; संतप्त जमावाकडून तिघांची धुलाई, कारचीही तोडफोड
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात अलीशान कारचा वापर करत त्यातून शेळ्यांची चोरी करणाऱ्या तिघांना गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. यात पोलिसांनी तिघांनाही अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
Buldhana Crime News : आपल्या वाचण्यात अथवा ऐकण्यात कायम अनेक चोरीच्या घटना (Crime News) येत असतात. काळानुरूप चोरीच्या पद्धती बदलल्या तशाच चोरीचे नवनवीन हातखंडा देखील बदलला आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) मोताळा तालुक्यातील कोथळी या गावात एका धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी चक्क आलीशान कारचा वापर केला आहे.
मात्र आता प्रश्न उपस्थित होतो की या व्यक्तीनी नेमकी चोरी केली तरी काय? तर त्यांच उत्तर आहे, शेळ्यांची! होय. कुणाला संशय येऊ नये म्हणून चोरीच्या शेळ्यांची वाहतूक करण्यासाठी त्यांनी आलिशान कारचा वापर केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आणि गावकऱ्यांनी त्यांना पकडून त्यांची एकच धुलाई केली. सोबतच त्यांच्या कारचीही तोडफोड केली. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत संतप्त जमावाला शांत करत या चोरी करणाऱ्या व्यक्तीना अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र या हटके चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चक्क आलीशान कार मधून शेळ्यांची चोरी
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी या गावातून काही अज्ञात व्यक्ती शेळ्यांची चोरी करून पळून जात असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. दरम्यान, शेळ्यांची चोरी करून पळून जाणाऱ्या या तिघांना गावातील जमावाने पकडून जाब विचारला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बघता बघता मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाला आणि त्यानंतर संतप्त जमावाने त्यांची एकच धुलाई केली. हे तिघे आलिशान कार मधून आलेत आणि त्यांनी गावातील शेळ्या या कार मध्ये चोरून पोबारा होत असताना गावातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर कोथळी गावातील नागरिकांनी या कारला अडवून शेळ्या चोरणाऱ्या तिघांची येथेच धुलाई केली. तसेच त्यांच्या कारचीही तोडफोड करत मोठे नुकसानही केले.
संतप्त जमावाकडून तिघांची धुलाई, कारचीही तोडफोड
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला शांत केले आणि या तिघांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी बोरखेडी पोलिसांनी सुरज हिवराळे , रविकांत हिवराळे आणि आशिष वानखेडे या तिघे संशयितांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एक कारही (कार क्रमांक एम एच 03 बीसी 3287) जप्त केली आहे. बोरखेडी पोलिसांनी प्रथम त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र या हटके चोरीने परिसरात एकच खळबळ उडवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या