चिमुकल्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ! अधिवेशनात गाजला मुद्दा, शिक्षक तडकाफडकी निलंबित
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील (Buldhana Chikhali School) एका जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतील एक शिक्षक छळ करत असल्याची धक्कादायक आणि संतापजनक बाब उघडकीस आली होती.
Buldhana Teacher News: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील (Buldhana Chikhali School) एका जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतील एक शिक्षक छळ करत असल्याची धक्कादायक आणि संतापजनक बाब उघडकीस आली होती. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात देखील उमटले आहेत. शिक्षण विभागाकडून या शिक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासलेल्या या घटनेमुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिक्षण विभागाला काळिमा फासणाऱ्या या घटनेची तोंडी तक्रार सुद्धा चिमुकल्या विद्यार्थिनीच्या आई वडिलांनी केली होती. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र माध्यमाने ही बाब उचलून धरली आणि 6 वर्षीय विद्यार्थिनीचा आवाज थेट विधानसभाच्या सभागृहात पोहोचला.
आमदार उमा खापरे यांनी मुद्दा सभागृहात लावून धरला
आमदार उमा खापरे यांनी हा मुद्दा सभागृहात लावून धरला आणि दोषी शिक्षकाला बडतर्फ करून चिमुकलीला न्याय देण्याची मागणी केली. जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली असल्याने जिल्हापरिषद शिक्षण विभागाने तातडीने गाव गाठले. शिक्षण विभागाकडून आता संबंधित शिक्षकाची सखोल चौकशी करायला सुरुवात केली आहे. सर्वांचे जाब नोंदविण्यात आले असून या शिक्षकाला तडकाफडकी निलंबित केल्याची माहिती शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी दिली आहे. या प्रकारामुळे मात्र जिल्ह्यात शिक्षण विभागात खळबळ उडाली असून याबाबत पुढील काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.
पीडितेची किंवा कुटुंबियांची अजूनही लेखी तक्रार नाही
याबाबत स्थानिक वृत्तपत्रात ही बातमी आल्याचा हवाला देऊन आमदार उमा खापरे यांनी विधिमंडळात प्रश्न लावून धरला. मात्र याविषयी पीडितेच्या कुटुंबियांनी याबाबतीत पोलीसात किंवा शिक्षण विभागाकडे अजूनही लेखी तक्रार केली नाही. सदर मुलीच्या आईने मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर फक्त मौखिक तक्रार केली असून यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी जवाब नोंदवून संबंधित शिक्षकाला निलंबित केलं आहे. दरम्यान अद्याप या प्रकरणी लेखी तक्रार का केली नाही? याबाबतही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेमुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित शिक्षकाची चौकशी करुन त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर