(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन
Breaking News LIVE Updates, 4 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
Mumbai Vaccination : आज मुंबईत लसीकरण बंद; पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरणाला ब्रेक
Mumbai Vaccination : देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. देशभरात लसीकरण मोहीमेनं वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. आज (बुधवारी) दिनांक 4 ऑगस्ट, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (बुधवार) दिनांक 4 ऑगस्ट 021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Tokyo Olympics 2020 : आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे. देशातील प्रत्येक जण आज यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून संघ केवळ दोन पावलं दूर
भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांना फायनल्स गाठण्यासाठी सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनावर मात करावी लागेल. सध्या भारतीय महिला संघानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाला 1-0 अशा फरकानं पराभूत करत माघारी धाडलं आहे.
भारतीय संघाला आक्रमक खेळी करावी लागेल
चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासानं आज सेमीफायनल्ससाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचा माजी सदस्य आणि ऑलंपियन जगबीर सिंहचं म्हणणं आहे की, अर्जेंटीनाचे खेळाडू अनेकदा आक्रमक होत हॉकी खेळताना दिसून येतात. अशातच आपल्या खेळाडूंनाही आक्रमक खेळी करावी लागले. त्यांचं म्हणणं आहे की, सामन्या दरम्यान भारतीय संघाला अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवावे लागतील. तसेच या पेनल्टी कॉर्नरवर गोलही डागावे लागतील.
आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत राज्यपाल यांच्याशी बोललो : दत्तात्रय भरणे
आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत राज्यपाल यांच्याशी बोललो आहोत. त्यांना किती जागांचा प्रश्न आहे. याबाबत देखील माहिती दिली. जवळपास 20 हजार जागा भरणं बाकी आहे. त्यामुळे तत्काळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फाईलवर सही केली आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुढील 2 तासांत फाईल राज्य सरकारकडे पोहचेल. विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 6 सदस्य आहेत. त्याची संख्या कमी पडेल अशी परिस्थिती आहे. ती संख्या वाढवण्याबाबत देखील आम्हाला राज्यपाल यांनी मान्यता दिली आहे : दत्तात्रय भरणे.
बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांच निधन.
बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे निधन. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावात भक्तांनी येऊ नये असं संस्थानच आवाहन.
आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससाठी उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु होईल : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत
आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससाठी उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. कोणत्याही प्रकारची सीईटी नसेल : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत.
राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांना आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या भेटी घेण्याचा अधिकार : चंद्रकांत पाटील
राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांना आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या भेटी घेण्याचा अधिकार आहे. मंत्रिमंडळाची भूमिका घटनेची पायमल्ली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली पाहिजे. कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आम्ही मदत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आम्ही मदत केली ती खरी मदत.
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी मी पूर्ण ऐकली. तरी देखील काही मुद्दे माझ्या मनात आहेत. त्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मनसेसोबत युतीबाबत आम्हाला केवळ पुणे किंवा विशिष्ट क्षेत्राचा विचार करून चालत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. पुण्यात युती केली आणि त्याचा फटका मुंबईत बसला असे होऊन चालणार नाही.
पुण्यातील दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास अजूनही परवानगी नाही. सरकारने व्यापाऱ्यांचा आक्रोश समजून घ्यावा.
राज्यांना एखाद्या जातीला मागास ठवण्याचा अधिकार असावा याबाबतचे दुरुस्ती विधेयक केंद्राने आणावे. आणि त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. यातून मराठा आरक्षणाचा विषय सुटू शकतो.
वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बाजारपेठेचा भाग स्थलांतरितच करता येतील का? : खासदार संजय काका पाटील
सांगलीच्या महापुराबाबत खासदार संजय काका पाटील यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बाजारपेठेचा भाग स्थलांतरितच करता येतील का? याबाबत केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने पाहणी अभ्यास सुरू करावा. केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांना भेटून ही मागणी केली आहे.