उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाशी गद्दारी करून शरद पवारांच्या मांडीला मांडी लावली ; नारायण राणेंची टीका
Narayan Rane : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काँगेस आणि राष्ट्रवादी सोबत फक्त मुख्यमंत्री पदासाठी गेले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
Narayan Rane : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदूत्वाशी गद्दारी केली आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावली. काँगेस आणि राष्ट्रवादी सोबत फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे गेले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सिंधुदुर्ग मधील मालवण येथे नारायण राणे बोलत होते.
नारायण राणे म्हणाले, "मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी झगडणारी शिवसेना असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले म्हणून आम्ही वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेत गेलो. बाळासाहेब असतानाची तेव्हाची भूमिका आणि आताची उद्धव ठाकरे असतानाची शिवसेनेची भूमिका वेगळी आहेत. मराठी माणूस सत्तेत कुठे आहे. शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटतात का?, आमदारांना भेटतात का? मुख्यमंत्री कुणालाही भेटत नाहीत. फक्त ते काचेच्या मातोश्रीत आहेत. कॅबिनेटला ते मंत्रालयात जात नाहीत."
"कालानगरच्या नाक्यांवर बोलतात तसे एकदाच विधिमंडळात मुख्यमंत्री बोलले. परवा BKC मध्ये भाषण केले, फक्त शिव्या घातल्या. हा तसा आहे, तो तसा आहे, आताच हॉस्पिटलमधून आल्यासारखा उद्धव ठाकरेंचा चेहरा वाटतो. आम्ही कुणाच्या चेहऱ्यावर, शरीरावर बोलत नाही. सुंदर चेहऱ्यावर केव्हाच बोलत नाही. दुसऱ्याच्या दिसण्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोला, प्रगतीबद्द्ल बोला, असा टोला नारायण राणे यांनी यावेळी लगावला.
नारायण राणे म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मी महाराष्ट्र भर फिरणार, त्यावर मला हसायला आलं. शिवसैनिकांना भेटायला महाराष्ट्रभर फिरणार. मुख्यमंत्र्यांचे डॉक्टर माझे मित्र आहेत. त्यांना फोन करून तुमचे पेशंट चालू शकतात का? असं विचारलं तर डॉक्टर म्हणाले वीस मिनिट चालू शकतात. त्यावर चालू शकत नाहीत. अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी एक विकासाचं, जनहिताचं काम केलं तर सांगावं आणि मग बढाया माराव्यात. शेतकऱ्यांना 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी भूमिका आमचं सरकार असताना होती. यांनी एक रुपया तरी दिला का? मुंबईत 1960 साली 70 टक्के मराठी लोक राहत होती. परंतु, आता केवळ 28 टक्के मराठी लोकवस्ती आहे.
"दरडोई उत्पनात गुजरात, तामिळनाडू, गोवा महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत. देशातील एक नंबर असलेलं राज्य यांना चालवता येत नाही. एकीकडे प्रगती सुरू असताना शिवसेना प्रगतीच्या आड येत आहे, अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी त्यांनी खासदार निनायक राऊत यांच्यावरही टीका केली. "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ पाहणीसाठी गेलो होतो. तेव्हा तिथे दिवसा दिसणारा रात्री न दिसणारा खासदार आंदोलन करत होता, असे राणे यांनी म्हटले.
"कोकणात विकासाच्या प्रत्येक कामात शिवसेना विरोध करते. रत्नागिरी मधील नाणार प्रकल्प परत गेला. हजारो मुला मुलींना रोजगार मिळाला असता. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार परत गेला. एन्रॉनच्या वेळी विरोध केला. परंतु,पदाधिकाऱ्यांच्या गाड्या लावल्या तेव्हा परवानगी मिळाली. माणुसकी म्हणून मी मालवण मधील देवबाग समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर करून आणला. मला निवडून देतील म्हणून हे काम केलं नाही. मी राज्यात काय देशात आज जे काम करतो ते माणुसकी म्हणून करतो. देशवासियांना मी माझी गुणवत्ता दाखवत आहे, असे नारायण राणे यांनी यावेळी म्हटले.
नारायण राणे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नऊ मंत्र्याची नावे जाहीर केली. त्यात नारायण राणे यांचं लघू आणि मध्यम उद्योग खातं एक नंबरला आहे. महाराष्ट्राची विधानसभा मी माझ्या भाषणाने हलवली. आजही विधानसभेच्या वाचनालयात माझी भाषणं आहेत. त्यातील भाषण ऐकली असती तर येथील आमदार वैभव नाईक दोन शब्द बोलले असते. त्यांना अजूनही काही बोलता येत नाही.
देवबागवासियांनी पाडल्याचं शल्य
"मुख्यमंत्री असलेल्या माणसाला देवबाग वासियांनी पाडलं ते शल्य आजही माझ्या मनात आहे. एवढी मंत्रिपदं सांभाळली त्यांना तुम्ही पाडलं. देवबाग हे देवाचं गाव असून निसर्गरम्य असं हे गाव आहे. चारी बाजूंनी पाणी आणि मध्येच वसलेलं गाव आहे.
आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका
"दाढी वाढवून बॅनर लावले म्हणून कोणी घाबरत नाही, पायाखालची मुंगी देखील मरत नाही. राणेंना पाडल्यामुळे जॉईंट किलर म्हणून नाव झालं. पोलीस संरक्षण घेऊन तरी मला बघायला सांगा. पाहिलं तर मी काहीही हरायला तयार आहे. वैभव नाईक हा लोकांचे पैसे लुटणारा आमदार आहे. सगळी कंत्राट, वाळूचे ठेके सगळं त्यांचचं आहे. आठ वर्षात एवढे कमावले मात्र तुमच्यासाठी एक कोटी का खर्च केले नाहीत. शिवसेनेचे नेते कमवत नाहीत का? आता तर धुतात, महाराष्ट्राला लुटतायेत अशी टीका राणे यांनी यावेळी केली.