(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना परत एकदा त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन डिवचले आहे.
Maharashtra Politics नागपूर : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना परत एकदा त्यांचे पुतणे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी डिवचले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सातत्याने विरोध करणारे अनिल देशमुख आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघात मात्र कॉल सेंटरच्या माध्यमातून या योजनेतून लाभार्थी महिलांना आपल्यामुळे तुम्हाला लाभ मिळाल्याचे सांगत असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना चांगली असेल तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवत योजनेचे स्वागत करावे, असे आवाहन आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांना केलेले आहे.
त्यामुळे एकीकडे लाडकी बहिण योजनेतून महिलांना आर्थिक मदत करणाऱ्या महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे याच योजनेवरुन नागपूर जिल्ह्यात काका-पुतणे परत एकदा आमने-सामने आल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप नेते आशिष देशमुख यांच्या टीकेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख कशा पद्धतीने आता उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लाडकी बहीण योजनेवरुन श्रेयवादाची लढाई
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेचे (Ladki bahin yojana) कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमधेय मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकांपूर्ती नसून पुढील 5 वर्षांपर्यंत चालणार असल्याचा विश्वासही ते देत आहेत. मात्र, त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन या राज्यकर्त्या नेते मंडळींकडून केले जात आहे. तर दुसरीकडे याच योजनेवरुन विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील लाडकी बहिण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरले त्यांना 8007721904 या नंबर वरून अनिल देशमुख यांच्या ऑफिस मधून बोलत असल्याचे सांगत विचारणा चालू आहे. या कॉलच्या माध्यमातून निवडणूक कॉम्पेनिंग द्वारे श्रेय घेणे चालू असल्याचा आशिष देशमुख यांनी दावा केला आहे.
कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले आहेत. मात्र 1 सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेला असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. अर्ज मंजूर झालेला असूनही या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे तसेच अर्जातील इतर त्रुटींमुळे महिलांना हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे वरील सर्व त्रुटी दुर केलेल्या महिलांना आता तिसऱ्या टप्प्यात 4500 रुपये मिळणार आहेत.
हे ही वाचा