Bidri Sakhar Karkhana : 'बिद्री' दरात पुन्हा लय भारी! 3209 रुपये ऊसदर जाहीर; 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
Bidri Sakhar Karkhana : श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3209 रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.
Bidri Sakhar Karkhana : श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3209 रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत के. पी. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, बिद्रीकडून जाहीर करण्यात आलेली ही जिल्ह्यातील उच्चांकी उचल असून यंदाही ऊसदराची परंपरा 'बिद्री'ने कायम राखल्याचे त्यांनी सांगितले. बिद्री कारखान्याकडून गेल्यावर्षीही एफआरपीनुसार 3056 रुपये दर एकरक्कमी दिला होता.
पाटील यावेळी म्हणाले की, गेली अनेक वर्षे महागाईबरोबर रासायनिक खते,औषधे यांच्या दराचा आलेख वाढत आहे. परिणामी साखरेचा हमीभाव वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याने खर्चात काटकसरीचे धोरण नेहमीच अवलंबले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना जादा ऊसदर देण्याची भूमिका कारखान्याने कायम ठेवली आहे. बिद्री साखर कारखान्याने ऊसदरासह तोडणी-वाहतूक, व्यापारी, कर्मचारी यांची देणी वेळेवर देऊन सर्व घटकांमध्ये विश्वास संपादित केला आहे.
ते पुढे म्हणाले, आधुनिकीकरणानंतर प्रतिदिन 8 हजार मे. टन क्षमतेने ऊस गाळपासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज असून यंदा 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी पाठवावा.
यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रविणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, राजेंद्र पाटील, प्रविण भोसले, उमेश भोईटे, मधुकर देसाई, एकनाथ पाटील, के. ना. पाटील, श्रीपती पाटील, जगदिश पाटील, युवराज वारके, धोंडीराम मगदूम, सुनिलराज सुर्यवंशी यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार, चिफ अकौंटंट एस. ए. कुलकर्णी, शेती अधिकारी बी.एन. पाटील यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhaprur News : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक; अलमट्टी उंची कळीचा मुद्दा असणार