Bhandara ZP Election : अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत ड्रामा; भाजपच्या चरण वाघमारेंची काँग्रेसला साथ
Bhandara ZP Election : काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर भाजप फुटीर गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष बनले आहेत.
भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठींचा आदेश झुगारुन भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली. काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर भाजप फुटीर गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष बनले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं.
भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये दोन गट पडले होते. 12 सदस्य जिंकून आले तरीही चरण वाघमारे यांच्याकडे पाच सदस्य होते. भाजपचा दुसरा गटात म्हणजेच परिणय फुके यांच्या गटात सात सदस्य होते. परंतु वाघमारे यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि एक अन्य सदस्याला सोबत घेऊन 27 मतं मिळवली. यामध्ये काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे हे अध्यक्ष तर भाजप फुटीरगटाचे संदीप टाले हे उपाध्यक्ष झाले.
माजी आमदार चरण वाघमारे सहा वर्षांसाठी भाजपमधून निष्काषित
दरम्यान, माजी आमदार चरण वाघमारे आणि पाच जिल्हा परिषद सदस्यांनी पक्ष आदेशमान्य केला नाही. पक्षश्रेष्ठींचा आदेश झुगारुन काँग्रेसला साथ दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार माजी आमदार चरण वाघमारे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निष्काषित करण्यात आलं. सोबतच तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील पक्षाची कार्यकारिणी रद्द केल्याचं भाजप प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी सांगितलं. चरण वाघमारे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली.
Bhandara ZP Election : अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज लढाई, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
नाना पटोले यांची चरण सिंह यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोली यांनी माजी आमदार चरण वाघमारे यांना पक्षाय येण्याची खुली ऑफर दिली आहे. आम्हाला चरण वाघमारेंसारखा विकास पुरुष मिळेल, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मात्र आपण कार्यकर्त्यांसोबत विचारमंथन करुन पुढील भूमिका ठरवू, असं चरण वाघमारे यांनी म्हणणं आहे.
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला
भंडारा गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. ते म्हणाले की, "राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपासोबत युती केली. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजपबरोबर हातमिळवणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला."
भंडारा जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाकडे किती जागा?
एकूण : 52 जागा
काँग्रेस : 21 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस : 13 जागा
भाजप : 12 जागा
शिवसेना : 01 जागा
बसपा : 01 जागा
वंचित : 01 जागा
अपक्ष : 03 जागा