Bhandara ZP Election : अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज लढाई, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
भंडारा जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने कोणत्या पक्षाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून येतो, याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अटीतटीची लढाई होणार असून जिल्हातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने कोणत्या पक्षाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे 52 सदस्यीय जिल्हा परिषदेत सर्वाधिक 21 निवडून आलेल्या उमेदवारांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा 13 सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी दावेदारी प्रस्तुत केली असून यासाठी आपल्या राजकीय वैरी भाजपची मदत घेण्यासाठी दोन्ही तयार आहेत. विशेष म्हणजे भाजपचा एक गट हा काँग्रेसच्या जवळचा आहे, तर दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ आहे. तर शिवसेना 01, बसपा 01 आणि वंचित 1 आणि अन्य 3 सदस्य आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना कोण करणार हे अजूनही अस्पष्ट आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद, भाजपमध्येही आजी-माजी आमदार आमनेसामने
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वाद पेटला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसशी युती न करता भाजपसोबत हातमिळवणी करत पंचायत समीत्यांवर सत्ता काबीज केली आहे. यामुळे भाजपला सुवर्ण संधी असली तरी भाजपमध्येही आमदार परिणय फुके आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटात अध्यक्षपदासाठी चढाओठ सुरु झाली आहे. पक्षातील अंतर्गत वाद पाहता अध्यक्षपद आपल्या हातून जाऊ नये यासाठी भाजपने आमदार चंद्रशेखर बावनकुळेंची निवडणूक निरीक्षकपदी निवड केली आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाकडे किती जागा?
एकूण : 52 जागा
काँग्रेस : 21 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस : 13 जागा
भाजप : 12 जागा
शिवसेना : 01 जागा
बसपा : 01 जागा
वंचित : 01 जागा
अपक्ष : 03 जागा
जागा असून सत्ता समीकरण आज काय ठरते याकडे जिल्हावासियांचं लक्ष आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे आमदार परिणय फुके, खासदार सुनील मेंढे आणि माजी आमदार चरण वाघमारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.