Pankaja Munde : माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचवण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही; भर पावसातल्या सभेत पंकजा मुंडेंचा हुंकार
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना अचानक जोरदार पाऊस आला. यावेळी हा पाऊस म्हणजे बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा संकेत असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी भरसभेत एकप्रकारे हुंकारच भरला.
Pankaja Munde Speech : बीड लोकसभा निवडणुकीसाठी (Beed Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड (Beed) तालुक्यातील नाळवंडी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू होताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, पंकजा मुंडे यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. तर लोकांमध्ये देखील पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाषण सुरू असताना पाऊस आला म्हणजे बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा संकेत आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणत महायुती भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भरसभेत एकप्रकारे हुंकारच भरला.
मोदीजींनी दिलेल्या संधीचे सोनं करू - पंकजा मुंडे
विरोधकांकडे सध्या कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळे तुमचं मत वाया घालू नका. बीड जिल्ह्याला विकास काय असतो, हे मी दाखवून दिलंय. जात-पात धर्म सोडून मला मतदान करा. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारातील कोणासाठी मत मागायला येणार नाही, असे देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये देशात अनेक मोठमोठ्या नेत्यांची तिकीट कापली. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी मला संधी दिली आहे. त्यामुळे मोदीजींनी जी संधी मला दिली तीचे आपण सोनं करू आणि बीड जिल्ह्याची जनता मला मान खाली घालायला लावणार नाही, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
बीडमध्ये पंकजा मुंडे वि. बजरंग सोनवणे लढत
बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे. त्यातच सोनवणेंनी जरांगेंची भेट घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बीडमधील वंजारी आणि ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या मागे उभा राहू शकतो, तर मराठा समाज बजरंग सोनवणेंना साथ देऊ शकतो, असं समीकरण सध्या राजकीय विश्लेषक मांडत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा वि.ओबीसी असा संघर्षहा पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी मतदारराजा नेमकं कुणाला कौल देतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
बीडच्या रणांगणात मराठा आरक्षणाचा मुद्दा
जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेले सहकारी आणि बीडचे रहिवाशी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी उशिरा अर्ज भरला. बीडमध्ये प्रचाराच्या मु्द्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे दोन्ही उमेदवार मराठा आरक्षणा संदर्भात सावध भूमिका मांडतानाचे दिसून येते आहेत. त्यामुळेच, आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून व समाजाच्या हितासाठी निवडणूक लढत असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले होते. तसेच, या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन, चर्चा केल्यानंतरच अर्ज ठेवायचा की मागे घ्यायचा याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या