Beed Crime: आत्याच्या मुलीकडून मित्राच्या मदतीनं मामाच्या मुलीची हत्या, बीडमधील कासारी गाव हादरलं!
बीडच्या कासारी (Beed Kasari Village) गावात घडलेल्या या घटनेनं अख्खं गाव अन् पंचक्रोशी हादरुन गेली आहे. आत्याच्या मुलीनं आपल्या मित्राच्या मदतीनं आपल्याच मामाच्या मुलीची हत्या केली आहे.
Beed Crime murder News: नात्यांना गालबोट लावणाऱ्या अनेक घटना होत असल्याचं आपण सातत्यानं पाहत असतो. अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. बीडच्या कासारी (Beed Kasari Village) गावात घडलेल्या या घटनेनं अख्खं गाव अन् पंचक्रोशी हादरुन गेली आहे. आत्याच्या मुलीनं आपल्या मित्राच्या मदतीनं आपल्याच मामाच्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेनंतर संबंधित मुलगी तिच्या मित्रासह फरार झाली आहे. साक्षी ज्ञानोबा कदम असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. वैष्णवी काळे आणि लखन तांबडे अशी फरार दोघांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि वैष्णवी या दोघीजणी नवीन कपड्यांना शिलाई मारण्यासाठी घरातून बाहेर पडल्या आणि इथेच वैष्णवीने साक्षीचा घात केला. मित्राच्या साहाय्याने मामाच्याच मुलीचा खून केल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या कासारी गावात उघडकीस आहे. साक्षीच्या आत्याची मुलगी वैष्णवी आणि लखन नावाच्या तिच्या मित्राने अज्ञात कारणावरून साक्षीला जबरदस्तीने विहिरीत ढकलून देऊन तिचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
साक्षी ही वैष्णवीच्या मामाची मुलगी असून या दोघी जणी सकाळी नवीन कपड्याला शिलाई मारण्यासाठी टेलरकडे जात आहोत असं सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र वैष्णवीने साक्षीला दुपारच्या वेळेस आपल्या शेतात नेलं आणि त्याच ठिकाणी वैष्णवीचा मित्र लखन आणि वैष्णवीने साक्षीला जबरदस्तीने विहिरीत लोटण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने बचावासाठी आरडाओरड केली. यावेळी साक्षीला विहिरीत लोटत असताना तिचे चुलते रमेश आणि आजी जनाबाई यांनी पाहिलं. ते दोघं विहिरीपर्यंत पोहोचेस्तोवर वैष्णवी आणि लखनने साक्षीला पाण्यात लोटून त्या ठिकाणाहून पळ काढला.
या सर्व प्रकरणानंतर आता लखन आणि वैष्णवी हे दोघे फरार असून साक्षीच्या हत्येप्रकरणी रमेश कदम यांच्या तक्रारीनंतर दिंदृड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन आणि वैष्णवी हे दोघेजण सध्या फरार असून त्यांनी साक्षीची हत्या का केली? यामागचं नेमकं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी साक्षीचे काका रमेश कदम यांनी तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत सांगितल्याप्रमाणे वैष्णवी आणि लखन पळून जाणार होते. हे साक्षीनं पाहिलं होतं, ती गावात इतरांना सांगेल यामुळं साक्षीला संपवलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेनं कासारी परिसरात खळबळ उडाली आहे.
ही बातमी देखील वाचा