Mumbai Crime : राजस्थानमधील राजघराण्याचा वारस असल्याचं सांगून 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक, 'टिक टॉक' स्टारला अटक
Mumbai Crime : सोशल मीडियामध्ये खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडून पैसे उकळल्याप्रकरणी टिक टॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. गोरेगाव पोलिसांनी आरोपीला आरे कॉलनीतून अटक केली
Mumbai Crime : आपण राजस्थानच्या शाही घराण्याचा वारस असल्याचं सांगून 50 हून अधिक महिलांची फसवणूक करणाऱ्या टिक टॉक स्टारला (Tik Tok Star) अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियामध्ये खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने या महिलांकडून पैसे उकळले होते. मुंबईतील (Mumbai) गोरेगाव पोलिसांनी त्याला आरे कॉलनीतून अटक केली आहे. पोखराज देवासी उर्फ राजवीर सिंह असं या आरोपीचं नाव आहे.
आरोपी महिलांना जाळ्यात कसं अडकवायचा?
आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत वेगळी होती. राजवीर सिंह हा राजस्थानच्या महालात स्वत:चे फोटो काढत असे आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड करत असे. यानंतर तो महिलांना फॉलो/फ्रेण्ड रिक्वेक्ट पाठवत असे. अनेक महिला त्याला राजस्थानच्या शाही घराण्याचा वारस समजून त्याची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारत असे. मग तो महिलांशी मैत्री करुन प्रेमाची बतावणी करायचा. यानंतर तो या महिलांकडे खासगी फोटो मागत असे. त्याच्या प्रेमात पडलेल्या महिला त्याला फोटो पाठवत असत. याच फोटोंचा वापर तो त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी करत होता, अशी माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली.
गोरेगावमधील तरुणीच्या तक्रारीनंतर अटक
गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 30 वर्षीय तरुणी या टिकटॉक स्टारच्या जाळ्यात अडकली होती. आरोपीने सुरुवातीला पीडित तरुणीकडे पैशांची मागणी केली होती. तिने त्याला चार लाख रुपये दिले. मात्र तो वारंवार पैसे मागू लागल्यानंतर तिने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने तिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला होता. अखेर कंटाळून महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
याआधीही अशाचप्रकारच्या गुन्ह्यात अटक
आरोपीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी भादंवि आणि आयटी अधिनियमचे विविध कलम लावून त्याला अटक केली. गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यामध्ये देखील मागील वर्षी आरोपी देवासी पोखराजविरोधात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होऊन त्यातही अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. आता पुन्हा अशाच गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
50 हून अधिक महिलांना ब्लॅकमेल
दरम्यान, आरोपी पोखराज देवासी हा मूळचा राजस्थानचा राहणारा आहे. त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट आलिशान आणि महागड्या गाड्या तसंच अवतीभवती सुरक्षारक्षण असल्याच्या फोटोंनी भरलेलं आहे. त्याने आतापर्यंत 50 हून अधिक महिलांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.