(Source: Poll of Polls)
Video : वटपौर्णिमेमुळे मोठी दुर्घटना टळली, बार्शीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; कानठळ्यांनी हादरला परिसर
बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाका कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे परिसरात मोठ्या आवाजाने कानठळ्या बसल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती
सोलापूर : डोंबिवलीतील एमआयडीमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण स्फोटाची घटना घडली. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, केमिकल कंपन्यांमधील कामगार आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षा हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. तर, दुसरीकडे फटाके बनवणारे कारखाने आणि त्यांमधील कामगारांच्या (Labour) सुरक्षेचाही मुद्दा तेवढाच ऐरणीवर आहे. धाराशिव जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाके कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर, काही दिवसांतच बार्शी (Barshi) तालुक्यातील शिराळे येथेही फटाक्याच्या कंपनीत भीषण स्फोट (Blast) झाला. आता, पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील घारी गावात भीषण स्फोटाने परिसर हादरला आहे. सुदैवाने वट पौर्णिमेमुळे (Vat purnima) मोठा अनर्थ टळला असून दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाका कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे परिसरात मोठ्या आवाजाने कानठळ्या बसल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटाचा आजूबाजूतील परिसराला बसला हादरा बसला. त्यानंतर, गावातील नागरिकांनी तत्काळा घटनास्थळी धाव घेतली. बार्शी तालुक्यातील घारी येथील ज्योतिबा नगर हनुमान टेकडीवर हा फटाक्याचा कारखाना असून युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा आहे. या फटाका कारखान्यात जवळपास 15 महिला मंजूर काम करतात. मात्र, सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला कामावर गेल्या नव्हत्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घारीतील या फाटके स्फोटात सुदैवाने कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नसून कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. त्यानतंर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कारखाना मालकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. दरम्यान, पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, ते पुढील कारवाई करत आहेत. मात्र, आगीच्या स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून बार्शी तालुक्यातील फटाक्यांच्या कारखान्यांमुळे परिसरातील सुरक्षा आणि नागरिकांच्या जीवास असलेल्या धोक्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वटपौर्णिमेमुळे वाचला जीव
आज वट पौर्णिमेचा दिवस, खरंतर आपल्या पतीला दिर्घायुष्य मिळावं, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला फेऱ्या घेऊन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आज, त्याच वटपौर्णिमेमुळे घारीतील फटाका कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना जीवनदान मिळाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, येथील फटाका कारखान्यात 15 महिला काम करत असल्याची माहिती आहे. वटपौर्णिमेमुळे या महिला आज कामावर गेल्या नाहीत.
गतवर्षीही झाला होता स्फोटो
बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये गतवर्षी जानेवारी महिन्यात फटका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. त्यामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 20 जण गंभीर जखमी झाले होते. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला होता. त्यानंतर, आता पुन्हा एकदा फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटाची घटना घडली आहे.