Bachchu Kadu on PM Modi : शेतमालाला हमीभावाची गॅरेंटी का देत नाही? आमदार बच्चू कडूंचा पीएम मोदींना करडा सवाल
Bachchu Kadu: पंतप्रधान मोदी अनेक गोष्टीची गॅरंटी देतात. मग शतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गॅरंटी मोदीजी कां देत नाही, असा प्रश्न उपस्थित करत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
अमरावती : देशातील शेतकरी (Farmers) पुन्हा किसान आंदोलन 2.0 साठी सज्ज झाले आहे. सध्या पंजाब, हरियाणा, यूपी, राजस्थानसह देशभरातील शेतकरी दिल्लीला (Delhi) कूच करण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीला चारी बाजूंनी शेतकऱ्यांनी घेरलं असून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख सीमांवर बॅरिकेड्स, काटेरी कुंपण, मोठे लोखंडी खिळे लावण्यात आले आहे. कसेही करून हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. अशातच राज्यात सत्तेत सहभागी असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केंद्र सरकारला थेट इशारा देत सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांना गॅरेंटी का देत नाही?
केंद्र सरकारने जो शेतकऱ्यांवर हल्ला केला त्याचा मी निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टीची गॅरंटी देतात. मग शतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गॅरंटी मोदीजी कां देत नाही, ती गॅरेंटी देखील मोदीजींनी दिली पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही सातवा-आठवा वेतन आयोग तुम्ही देता, पगाराची हमी तुम्ही देता, इतर बाबती हमी देता, त्याच त्याचप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना का हमीभाव देत नाही. असा प्रश्न उपस्थित करत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या याबाबतीत हे सरकार पूर्णपणे फेल
शेतकऱ्यांच्या याबाबतीत हे सरकार पूर्णपणे फेल झाले आहे. आजघडीला मी जरी सरकारमध्ये शामील असलो तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत दोन- तीन गोष्टी सोडल्या, तर केंद्र आणि राज्य सरकारने कुठलीही चांगली योजना केली नसल्याचे म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव जर योग्य पद्धतीने दिला कुठलीही योजना आखण्याची गरजच पडणार नाही. शेतकऱ्यांना हमीभाव हा दिलाच पाहिजे, ही अतिशय रास्त मागणी असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले.
सरकारने ही डाकेखोरी बंद केली पाहिजे
जेव्हापासून हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून शेतकरी हमीभाव मागतो आहे. स्वामीनाथन आयोग हा संपूर्ण देशासाठी लागू झाला पाहिजे. आज शेतमालाला 15% नफ्याने सुद्धा भाव मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. कपासाचे भाव हे सहा हजारावर गेले. आज कापसाला क्विंटल मागे 12 हजार रुपये खर्च लागतो. हे मी सांगत नाही तर, राज्य सरकार असे सांगत आहे. म्हणजे नफा तर दूर आज शेतकरी तोट्यात जाऊन शेती करत आहे. अशी जर शेतकऱ्यांची अवस्था राहिली, तर मला असं वाटतं, तुमच्या त्या विकासाच्या योजनांचं काय करावे. शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसेच येणार नसतील, शिवाय उरले सुरले पैसे ही फुकट शेतीत जात असतील तर सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांच्या खिशावर डाकाच टाकत आहे. त्यामुळे सरकारने ही डाकेखोरी बंद केली पाहिजे, असे देखील आमदार बच्चू कडू म्हणाले.
दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही भाजपसोबत का गेले?
हे सर्व विकासाचे जाळे आहे. विकासाचा जाळ्यामध्ये अशोक चव्हाण फसले आहे. मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतं की अशोकराव दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. कॅबिनेट पंधरा वर्षे राहिले मात्र तरी देखील ते भाजपमध्ये का गेले. असे असले तरी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र लोकांच्या मनात जो संभ्रम आहे इतके सगळे मिळून देखील ते भाजपमध्ये का गेले, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. असा टोला देखील बच्चू कडू यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या