Babanrao Taywade : मनोज जरांगेंची भूमिका म्हणजे बालहट्टपणा; बबनराव तायवाडेंची टीका
Babanrao Taywade On Manoj Jarange : मनोज जरांगे यांची भूमिका म्हणजे बालहट्ट म्हणावे लागेल असे शब्दात बबनराव तायवाडे यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.
Babanrao Taywade On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराटीमधून पायी दिंडी निघाली आहे. दरम्यान, यावरूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांची भूमिका म्हणजे बालहट्ट म्हणावे लागेल असे शब्दात बबनराव तायवाडे यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना तायवाडे म्हणाले की, "मनोज जरांगे यांची भूमिका म्हणजे बालहट्ट म्हणावे लागेल. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या असा दावा मनोज जरांगे करतात. खरंतर या पैकी 99.5 टक्के लोकांनी आधीच कुणबी प्रमाणपत्र घेतले असल्याचे तायवाडे यांनी सांगितले. जात प्रमाणपत्र देतांना महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंदी ग्राह्य मानल्या जातात, मात्र, शिंदे समितीने इतर 11 दस्तावेजाचा यात समावेश केला. ज्याला शासकीय मान्यता नाही, त्यामुळे हा वादाचा विषय बनेल. जर, शासन मान्यता दिली तर त्या नोंदी ग्राह्य मानल्या जाईल, मात्र त्यावर काही आक्षेप पुढे येत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने 31 डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले. मात्र 9 दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकत नाही. तरीही तसे करण्यात आल्यास अनेक त्रुटीयुक्त सर्वेक्षण असेल असेही,” तायवाडे म्हणाले.
लाखो मराठे मुंबईच्या दिशेने...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यानुसार आज सकाळीच आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे हजारो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा बांधव देखील या पायी दिंडीत सहभागी झाल्याने लाखो मराठे एकाचवेळी मुंबईकडे कूच करतांना पाहायला मिळत आहे. कोणी दुचाकीवरून, कोणी चारचाकी तर कोणी ट्रक घेऊन या दिंडीत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईपर्यंत जातांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणखी मराठा आंदोलक या पायी दिंडीत सहभागी होणार आहे.
जरांगेनी स्थगित करावे...
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.“ मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट आहे. 54 लाख कुणबी दाखले उपलब्ध झालेत. दाखले वितरणासाठी महसूल खात्याने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सगेसोयरेची मागणी तत्वता मान्य केली आहे. दाखले वितरणाच्या प्रक्रियेला थोडा कालावधी लागेल. जरांगेनी सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आंदोलन स्थगित करावे, असे विखे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: